नागपूर विमानतळावर ३० लाखांचे सोने पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 23:15 IST2020-01-10T23:13:18+5:302020-01-10T23:15:26+5:30
एअर अरेबियाच्या विमानाने शारजाह येथून नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या तीन प्रवाशांकडून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० लाख किमतीचे सोने ताब्यात घेतले.

नागपूर विमानतळावर ३० लाखांचे सोने पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर अरेबियाच्या विमानाने शारजाह येथून नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या तीन प्रवाशांकडून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० लाख किमतीचे सोने ताब्यात घेतले. तिघेही नागरिक उत्तर भारतीय असल्याची माहिती आहे. या तिघांना सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिघांचा जामीन झाल्याची माहिती आहे.
एअर अरेबियाचे शारजाह-नागपूर विमान पहाटे ३.४५ वाजता येते. गुरुवारी या विमानाने तिघेजण सोने घेऊन येत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच कळाली होती. तिघांची झडती घेतली असता त्यांनी सोने एका धातूमध्ये मिसळून पार्श्वभागात दडवून ठेवल्याचे आढळून आले. तिघांकडून जप्त केलेल्या मुलायम धातूचे वजन दीड किलो होते. पण त्यात जवळपास ७०० ग्रॅम सोने असल्याची माहिती सूत्रांनी दिली.