वास्को - आज दुपारी गोव्याच्या दाबोळी मतदारसंघातील चिखली भागातील तीन फ्लटॅमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या मुख्य दरवाजा फोडून आत प्रवेश केल्यानंतर येथे असलेले सोन्याचे ऐवज, रोखरक्कम व इतर सामान मिळून ९ लाख रुपयांची मालमत्ता लंपास केली. दुपारी १२ ते १२.३० च्या आत सदर चोरींची प्रकरण घडली असून चोरी झालेले दोन फ्लॅट एकाच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील असून तिसरा फ्लॅट त्या दोन फ्लॅटपासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अन्य एका इमारतीतील आहे.चिखली, दाबोळी भागातील विद्यामंदिर विद्यालयाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या ‘हरी दपर्ण’ इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची माहीती वास्को पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन ह्या प्रकरणात चौकशीला सुरवात केली. ह्या इमारतीत राहणाऱ्या राजेश डीचोलकर व हरी कुमार यांच्या मालकीच्या एक मेकाच्या बाजूलाच असलेल्या फ्लॅटमध्ये चोरी झाली असून जेव्हा ही घटना घडली त्यावेळी दोन्ही घरात कोणीही नसल्याची माहीती पोलीसांना मिळाली आहे. १२.३० च्या सुमारास हरी कुमार यांची पत्नी घरी परतली असता तिच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे टाळे अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केल्याचे तिला जाणवले. तसेच शेजाऱ्याला असलेल्या डीचोलकर यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे टाळे तोडण्यात आल्याचे तिच्या नजरेस आल्यानंतर याबाबत पोलीसांना माहीती देण्यात आली. ह्या दोन्ही फ्लॅटमध्ये असलेली कपाटे घरात घुसल्यानंतर चोरट्यांनी उघडून आत असलेली रोख रक्कम व सोन्याचे ऐवज लंपास केल्याचे तपासणीच्या वेळी पोलीसांना उघड झाले. ह्या दोन्ही फ्लॅटमधून केवढी मालमत्ता चोरीला गेलेली आहे याबाबत वास्को पोलीस सध्या तपास करीत असून राजेश डीचोलकर यांच्या फ्लॅटमधून रोख व सोन्याचे ऐवज मिळून २ लाख तर हरी कुमार यांच्या फ्लॅटमधून रोक व सोन्याचे ऐवज मिळून २ लाख २० हजार रुपयांची मालमत्ता लंपास करण्यात आलेली असल्याचा अंदाज सध्या व्यक्त करण्यात येत आहे.ह्या दोन चोरी प्रकरणाबरोबरच दाबोळी मतदारसंघातील चिखली भागात असलेल्या ‘जोर्गस पार्क’ जवळील ‘सुरेखा अपार्टमेंन्ट’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या संतोष शर्मा यांच्या फ्लॅटमध्ये कोणीही नसताना चोरट्यांनी दरवाजा फोडून आत प्रवेश केल्यानंतर येथील कपाटे फोडून सोन्याचे ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याचे दुपारी उघडकीस आले. संतोष याच्या घरात असलेली रोख रक्कम व सोन्याचे ऐवज मिळून चोरट्यांनी अदमासे ३ लाख ५० हजार रुपयांची मालमत्ता येथून लंपाक केल्याचा अंदाज असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. चिखली ह्या एकाच भागातील तीन फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांनी प्रवेश करून येथील मालमत्ता लंपास केल्याने ह्या भागात राहणाऱ्या नागरिकांत सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहीती घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांना संपर्क केला असता तिनही चोरी घरात कोणीही नसताना झाल्याने चोरी करणारी ही टोळी नजर ठेवून असत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. श्वान पथक तसेच ठसे तज्ञांच्या मदतीने येथे पंचनामा करण्यात आलेला असल्याची माहीती त्यांनी देऊन चोरट्यांना गजाआड करण्यासाठी विविध मार्गाने तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.
दिवसाढवळ्या दाबोळीतील ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडले; साडे सात लाख रुपयांची मालमत्ता केली लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 20:29 IST
दुपारी १२ ते १२.३० च्या आत सदर चोरींची प्रकरण घडली असून चोरी झालेले दोन फ्लॅट एकाच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील असून तिसरा फ्लॅट त्या दोन फ्लॅटपासून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अन्य एका इमारतीतील आहे.
दिवसाढवळ्या दाबोळीतील ३ फ्लॅट चोरट्यांनी फोडले; साडे सात लाख रुपयांची मालमत्ता केली लंपास
ठळक मुद्दे १२.३० च्या सुमारास हरी कुमार यांची पत्नी घरी परतली असता तिच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे टाळे अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केल्याचे तिला जाणवले. श्वान पथक तसेच ठसे तज्ञांच्या मदतीने येथे पंचनामा करण्यात आलेला असल्याची माहीती त्यांनी देऊन चोरट्यांना गजाआड करण्यासाठी विविध मार्गाने तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले.