'अपत्य नसणाऱ्या महिलेला गर्भवती करा अन् लाखो कमवा' अशा प्रकारच्या जाहिराती बिहारच्या नवादामध्ये मागील काही दिवसांपासून जागोजागी पाहायला मिळत होत्या. अनेकांनी जाहिरात पाहून त्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधला. तुम्हाला अशा महिलांना प्रेग्नेंट करायचे आहे ज्यांना मुल नाही. जर ही महिला प्रेग्नेंट झाली तर तुम्हाला ५ लाख मिळतील आणि महिला गर्भवती झाली नाही तरीही तुम्हाला ५० हजार रुपये दिले जातील अशी बतावणी समोरून करण्यात आली.
बहुतांश तरुणांनी पैसा कमावण्याच्या लालसेपोटी या कामाला होकार दिला परंतु त्यांच्यासोबत पुढे काय घडणार हे त्यांना माहिती नव्हते. जाहिरात देणाऱ्यांनी या तरुणांना रजिस्ट्रेशनच्या नावाखाली फी भरायला सांगितली. काही तरुणांनी फी भरली मात्र त्यानंतर जाहिरात देणारे त्यांना ब्लॉक करत होते. जेव्हा हे प्रकरण पोलिसांकडे पोहचले तेव्हा त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. जाहिरातीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणी ३ सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. बेबी बर्थ सर्व्हिस, प्ले बॉय सर्व्हिस नावाने या टोळीने अनेकांची फसवणूक केल्याचं उघड झाले.
५० हजार ते ५ लाखापर्यंत उत्पन्न
माहितीनुसार, या सायबर गुन्हेगारांनी देशातील विविध राज्यातील लोकांना कॉल करून त्यांना या जॉबची ऑफर दिली ज्यात अशा महिलांना प्रेग्नेंट करायचे आहे ज्यांना मुल नाही. या कामाच्या बदल्यात त्यांना ५ लाख रुपये दिले जातील असं सांगितले जायचे. जरी महिला गर्भवती राहिली नाही तरीही ५० हजार रुपये दिले जातील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. जेव्हा एखादा कुणी या कामासाठी तयार व्हायचा तेव्हा त्याच्याकडून रजिस्ट्रेशनच्या नावाखाली ५०० रुपये ते २० हजार रुपये ऑनलाईन पेमेंट घ्यायचे. या टोळीने अनेक ठिकाणी त्यांच्या जाहिरात लावल्या होत्या त्यातून लोक स्वत: त्यांना फोन करायचे.
दरम्यान, या सायबर गुन्हेगारांकडून पोलिसांनी ६ मोबाईल जप्त केलेत. या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप फोटो, ऑडिओ आणि व्यवहाराचे पुरावे आहेत. या गुन्ह्यात १९ वर्षीय आरोपी राहुल कुमार, २० वर्षीय भोला कुमार आणि पंकज कुमार यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व कहुआरा गावातील रहिवासी आहेत. पोलीस यांच्या टोळीच्या नेटवर्कचा शोध घेत आहेत. सध्या याचा तपास सुरू आहे.