20 year old commits suicide by killing father grandfather in mumbais mulund | VIDEO: वडील, आजोबांची हत्या करून तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

VIDEO: वडील, आजोबांची हत्या करून तरुणाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

मुंबई: वडील आणि आजोबांची हत्या करून २० वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडली आहे. शार्दुल मिलिंद मांगले असं तरुणाचं नाव आहे. शार्दुलनं वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. त्यानं वडील आणि आजोबांची हत्या का केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. (20 year old commits suicide by killing father grandfather)

मांगले यांच्या घरी वडील आणि आजोबांची देखभाल करण्यासाठी केअर टेकर ठेवण्यात आला होता. सकाळी साडे आठच्या सुमारास केअर टेकर वडिलांना चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेला असताना शार्दुलनं वडिलांवर चाकूनं सपासप वार केले. शार्दुलनं केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेले वडील ओरडले. जोराचा आवाज आल्यानं केअर टेकर किचनमधून बाहेर आला. तेव्हा शार्दुल त्याला वडिलांवर वार करताना दिसला.शार्दुलला पाहून केअर टेकर घाबरला. जखमी वडिलांनी पायऱ्यांवर धाव घेतली. शार्दुलनं त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पुन्हा वार केले. वडील मेल्याची खात्री पटल्यानंतर तो पुन्हा खोलीच्या दिशेनं आला. केअर टेकरनं  ८४ वर्षीय आजोबांना बाथरूममध्ये लपण्याचा सल्ला दिला. मात्र ते आले नाहीत. खोलीत आलेल्या शार्दुलने त्यांचीही हत्या केली आणि त्यानंतर स्वतः इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.

या घटनेमुळे सोसायटीमध्ये एकच खळबळ उडाली. सोसायटीतील रहिवाशांनी घडलेल्या घटनेची माहिती तातडीनं मुलुंड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घरात वडील आणि आजोबांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

Web Title: 20 year old commits suicide by killing father grandfather in mumbais mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.