इतवारीतील अनाज बाजारात २० लाखांची लूट; चार आरोपींनी पळविली बॅग
By योगेश पांडे | Updated: September 27, 2022 23:32 IST2022-09-27T23:32:32+5:302022-09-27T23:32:57+5:30
ऐन गर्दीच्या वेळी रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे इतवारीत खळबळ उडाली होती. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता.

इतवारीतील अनाज बाजारात २० लाखांची लूट; चार आरोपींनी पळविली बॅग
नागपूर : इतवारीतील अनाज बाजारात मंगळवारी रात्रीच्या सुमारास एका व्यापाऱ्याचे २० लाख रुपये लुटण्यात आले. संबंधित व्यापारी दुकानातून पैसे जमा करण्यासाठी निघाला असतानाच ही घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळी रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे इतवारीत खळबळ उडाली होती. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता.
अनाज बाजारात रमेशचंद्र ॲंड कंपनीतील चावडा नामक व्यापारी काम संपल्यानंतर पैसे भुतडा चेंबरकडे निघाले होते. त्यांच्या हातात २० लाख रुपये असलेली बॅग होती व ते पायीच निघाले होते. त्यांच्या पाठीमागून चार ते पाच लोक आले व त्यांनी त्यांच्यावर शस्त्राने वार केला. वार जोरात असल्याने ते कळवळले व त्या कालावधीत एकाने त्यांच्या हातातील पैशांची बॅग घेऊन पळ काढला. काही क्षणांच्या आतच ही बॅगलिफ्टिंग घडली. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले.
बाजारातील दुकाने सुरू असतानाच झालेल्या या प्रकारामुळे इतर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली व अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लकडगंज पोलीस ठाण्यातदेखील माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्यासह लकडगंज पोलीस ठाण्यातील पथकदेखील तातडीने तेथे पोहोचले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतल्या जात आहे.