अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींमध्ये मिळाल्या १६ जिलेटिन कांड्या, १७ डिटोनेटर
By जितेंद्र कालेकर | Updated: September 12, 2023 20:02 IST2023-09-12T20:01:51+5:302023-09-12T20:02:39+5:30
कळवा, मुंब्रा खाडीतील घटना : जिल्हाधिकारी दक्षता पथकाची कारवाई

अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींमध्ये मिळाल्या १६ जिलेटिन कांड्या, १७ डिटोनेटर
ठाणे: अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या एका बोटीमध्ये मंगळवारी दुपारी १६ जिलेटीनच्या कांड्या आणि १७ डिटोनेटर मिळाल्याने एकच खळबळ उडाली. खाडीतील रेती काढण्यासाठी या स्फोटकांचा वापर केला जात असल्याचा दावा केला जात असून यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील दक्षता पथकाची अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी कळवा रेतीबंदर आणि मुंब्रा उल्हास नदी परिसरातील खाडी किनारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी गस्त सुरु हाेती. त्यावेळी या पथकाला रेती उपसा करणाऱ्या दोन बेवारस बोटी कळवा रेतीबंदर खाडीकडे आढळल्या. या बोटींची विल्हेवाट लावत असतांनाच त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या आणि डिटोनेटर मिळाले. त्यामुळे कळवा पोलिसांसह बॉम्बनाशक पथकालाही घटनास्थळी पाचरण केले. सुरुवातीला स्फोटकांचा नेमका वापर कशासाठी केला जातो, याची नेमकी माहिती पोलिसांनाही नसल्यामुळे या भागात घबराटीचे वातावरण पसरले होते. चौकशीमध्ये खाडीतील घट्ट बसलेली रेती मोकळी करण्यासाठी या स्फोटकांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली.
कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थाेरात यांच्या पथकाने पंचनामा केला असून बोटी मिळालेले ठिकाण हे मुंब्रा हद्दीत असल्याने हा गुन्हा मुंब्रा पोलिसांकडे वर्ग केला. या संपूर्ण प्रकरणाचा आणि यातील आरोपींचा तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी सांगितले.