विश्रामबागचा कॅफे फोडणाऱ्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी
By घनशाम नवाथे | Updated: May 18, 2024 21:23 IST2024-05-18T21:22:06+5:302024-05-18T21:23:01+5:30
या प्रकरणात संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विश्रामबागचा कॅफे फोडणाऱ्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी
घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: विश्रामबाग परिसरातील हँग ऑन, डेनिस्को आणि सनशाईन कॉफी शॉपमध्ये घुसून दगडाने आणि काठीने तोडफोड केल्याप्रकरणी अटक केलेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विश्रामबाग येथील तीन कॉफी शॉपची तोडफोड केल्याप्रकरणी मालक आशुतोष घाडगे (रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित रणजित चंदन चव्हाण, रोहित रामचंद्र मोरे, करण महालिंग म्हेत्रे, विक्रांत विठ्ठल कोळी, विनायक बसाप्पा आवटी, शंकर नागराज वडर, संदीप अशोक जाधव, अर्जुन ईश्वर गेजगे, अविनाश पोपट भोसले, प्रथमेश अशोक सूर्यवंशी, योगेश बाळू गुरखा, मारूती गोविंद घुटुगडे, विलास गोपाळ पवार, सागर अनिल सूर्यवंशी, प्रदीप अधिकराव पाटील, दिगंबर मनोहर साळुंखे (रा. सांगली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संशयितांनी नेमिनाथनगर क्रीडांगणावर एकत्र येऊन कॉफी शॉपमध्ये घुसून साहित्याची तोडफोड व नुकसान करण्याचे ठरवले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता हँग ऑन तसेच खरे मंगल कार्यालयाजवळील डेनिस्को, सनशाईन कॉफी शॉपमध्ये घुसून तोडफोड केली. पोलिसांनी यावेळी १६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. १६ जणांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा तपासासाठी पोलिसांनी कोठडी मागितली. न्यायदंडाधिकारी यांनी १६ जणांना दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली. सहायक निरीक्षक तानाजी कुंभार तपास करत आहेत.
दरम्यान, तपासात संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले यांच्या सांगण्यावरून ही तोडफोड झाल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.