नागपुरात कंटेनरमधून १.५९ कोटीच्या मोबाईलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 23:55 IST2020-07-15T23:53:45+5:302020-07-15T23:55:24+5:30
पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरात कंटेनरमधून १.५९ कोटीच्या मोबाईलची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील रहिवासी चालक आदेश कुमार कथेरिया (३४) हा १० कोटी रुपयांचे मोबाईल घेऊन कंटेनर क्रमांक आर. जे. ११, जीबी-५६६६ ने हरियाणाला जात होता. कंटेनरमध्ये आदेश कुमार याच्या शिवाय दुसरे कुणीही नव्हते. आंध्रप्रदेशवरून रवाना झाल्यानंतर तो यवतमाळ मधील पांढरकवडा येथे पोहोचला. तेथे धाब्यावर भोजन केल्यानंतर तो झोपी गेला. काही वेळ आराम केल्यानंतर १८ मार्चला दुपारी बेलतरोडी ठाण्यांतर्गत पांजरी टोल नाक्यावर पोहोचला. तेथे आदेश कुमारने कंटनेरच्या टायरची हवा तपासली. त्याला कंटेनरचे सील आणि सेंटर लॉक तोडण्यात आल्याचे समजले. कंटेनरची तपासणी केली असता मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. या घटनेची बेलतरोडी ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. आदेश कुमार काही वेळासाठीच पांजरीला उतरला होता. दरम्यान तो कंटेनरजवळ उभा होता. पांढरकवडा येथे कंटेनर बराच वेळ उभा होता. यामुळे हे प्रकरण यवतमाळ पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. पांढरकवडा पोलिसांनी त्यांच्या परिसरात चोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कंटेनरमधून ओप्पो कंपनीचे २३६० मोबाईल चोरी झाल्याची माहिती आहे. त्यांची किंमत १.५९ कोटी रुपये आहे. आता तीन महिन्यानंतर बेलतरोडी पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.