अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सश्रम कारावास
By जितेंद्र कालेकर | Updated: July 27, 2023 21:42 IST2023-07-27T21:41:22+5:302023-07-27T21:42:24+5:30
ठाणे न्यायालयाचा निकाल, कळवा पोलिसांनी केला तपास

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सश्रम कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळव्यातील आतकोनेश्वरनगर भागातून एका १५ वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अस्लम मोहम्मद अन्सारी (३०) या आरोपीला ठाणे न्यायालयाने सश्रम कारावासाची आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कैदेच्या अतिरिक्त शिक्षेचा आदेश न्यायालयाने दिला.
शाळेला सुटी असल्याने पीडित मुलगी भिवंडीतील काल्हेर भागात जात होती. त्याच दरम्यान तिची अस्लम याच्याबरोबर ओळख झाली. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिला फूस लावून १३ जून २०१८ रोजी पळवून नेले. या काळात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. कळवा पोलिस ठाण्यात अपहरणासह बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक झाली. या खटल्याची सुनावणी २७ जुलै २०२३ रोजी ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश तसेच विशेष पोक्सो न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांच्या न्यायालयात झाली. तपास अधिकाऱ्यांसह नऊ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. आरोपीच्या शिक्षेसाठी विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजू पडताळल्यानंतर न्या. विरकर यांनी वरील शिक्षा सुनावली.