रोहितने नैसर्गिक खेळच करावा, लक्ष्मणचा सल्ला

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी मालिकेदरम्यान आपल्या नैसर्गिक खेळावरच जोर द्यावा.

नवी दिल्ली : रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी मालिकेदरम्यान आपल्या नैसर्गिक खेळावरच जोर द्यावा. कारण डावाच्या सुरुवातीदरम्यान तंत्रात बदल केल्याने त्याच्या स्वत:च्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम पडला होता, असे मत व्हीव्हीएस लक्ष्मणने शनिवारी व्यक्त केले.
लक्ष्मण मधल्या फळीतील तज्ज्ञ फलंदाज होता. त्याला १९९६ ते ९८ दरम्यान डावाची सुरुवात करण्यास सांगितले होते; परंतु तो कधी त्या स्थानावर सहजपणे खेळू शकला नव्हता.
लक्ष्मणने भारतीय क्रिकेटर दीप दासगुप्ता याच्या यूट्यूब चॅनल ‘दीप पॉइंट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, ‘सर्वांत फायद्याची बाब म्हणजे रोहितजवळ अनुभव आहे आणि जो की माझ्याजवळ नव्हता. मी केवळ चार कसोटी सामने खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला आलो होतो. रोहित १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याच्यात परिपक्वता आणि अनुभव आहे व त्याचबरोबर तो चांगल्या लयीत आहे.’
लक्ष्मणने १३४ कसोटींत ८ हजार ७८१ धावा केल्या आहेत. ४४ वर्षीय या माजी क्रिकेटपटूने म्हटले की, ‘मधल्या फळीतील फलंदाज म्हणून जे यश मिळाले होते, त्या मानसिकतेत सलामीला डावाची सुरुवात करण्याची मी चूक केली होती. जर तुम्ही नैसर्गिक खेळाशी छेडछाड केली, तर त्याचा फायदा मिळणार नाही. कारण, तुमची द्विधा मन:स्थिती होईल.’

मी फलंदाजीच्या तंत्रात बदल करण्याचा प्रयत्न केला होता. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून मी नेहमी ‘फ्रंट-प्रेस’नंतर चेंडूंवर जात होतो; परंतु सीनिअर खेळाडू आणि प्रशिक्षकांशी चर्चा केल्यानंतर मी त्यात बदल केला.
- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण

संदर्भ पढ़ें