आजऱ्याजवळ तीन ठार
By Admin | Updated: September 14, 2014 00:36 IST2014-09-14T00:29:28+5:302014-09-14T00:36:02+5:30
कार ओढ्यात कोसळली : मृतांमध्ये मुलगी जावयासह कोल्हापूरचा उद्योजक

आजऱ्याजवळ तीन ठार
कोल्हापूर : कोल्हापूर येथून गोव्याकडे निघालेली मारुती स्विफ्ट कार ओढ्यात कोसळल्याने साखर कारखान्याचे बेअरिंग्ज उत्पादक लालसिंग जयसिंग रजपूत (वय ७८, रा. आर. के. नगर कोल्हापूर), मुलगी अल्पना महेश धमोणे व जावई महेश धमोणे हे तिघेजण ठार झाले. तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. आजरा-आंबोली मार्गावर सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास वेळवट्टीनजीक हा अपघात झाला.
घटनास्थळावरून व आजरा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रजपूत हे कोल्हापूरहून आपले जावई महेश मुरारी धमोणे (३४, रा. बेळगाव), मुलगी अल्पना महेश धमोणे (३०) यांच्यासह कुटुंबीयांसवेत गोवा येथील मुलीकडे मारुती स्विफ्टमधून आजरामार्गे निघाले होते.
गाडीमध्ये एकूण आठजण होते. गाडी वेळवट्टी धरणानजीकच्या वळणावर वेगाने आली असता वळणाचा अंदाज न आल्याने ती सुमारे ३० फूट खोल ओढ्यात कोसळली.यामध्ये कार चालवणारे महेश मुरारी धमोणे हे जागीच ठार झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडे बेबीताई लालसिंग रजपूत यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर त्यांना अपघात झाल्याचे समजले.
अन्य वाहनचालकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढले. लालसिंग रजपूत, अल्पना धमोणे, अमित लालसिंग रजपूत (३४) व शिखा महेश धमोणे (२), श्रीशा महेश धमोणे (१०), अनिता लालसिंग रजपूत (२५) व बेबीताई लालसिंग रजपूत यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना गडहिंग्लज येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले.
दरम्यान, अल्पना महेश धमोणे व लालसिंग रजपूत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमित व शिखा यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरात हलविण्यात आले. या दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातानंतर अपघातस्थळी वाहनचालक व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. नेमकी माहिती उपलब्ध होत नसल्याने गोंधळ निर्माण झाला. या मार्गावरून जाणाऱ्या विजय राशिवडेकर या आजरा आगाराच्या वाहकासह दिनेश कुरुणकर व अन्य स्थानिक मंडळींनी जखमींना हलविण्यात मोठी मदत केली. (प्रतिनिधी)