अकोला जिल्हय़ातील सहा तालुक्यात अतीवृष्टी
By Admin | Updated: September 9, 2014 21:14 IST2014-09-09T21:11:45+5:302014-09-09T21:14:37+5:30
सरासरी ७३.६३ मि.मी. पाऊस; नदी-नाल्यांना पूर.

अकोला जिल्हय़ातील सहा तालुक्यात अतीवृष्टी
अकोला : गेल्या चोवीस तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला असून, जिल्ह्यात सरासरी ७३.६३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाली आहे. सार्वत्रिक मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ातही वाढ झाली आहे. रविवारी सकाळी ८.३0 वाजतापासून जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस सुरू झाला, दिवसभर मुसळधार पाऊस बरसला, रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. तसेच सोमवारीदेखील दिवसभर पाऊस सुरूच होता. गेल्या चोवीस तासांत बरसलेल्या धो-धो पावसामुळे जिल्ह्यात सरासरी ७३.६३ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.
** अतवृष्टीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे!
गेल्या चोवीस तासांत सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. जिल्ह्यात सरासरी ७३.६३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यामध्ये अकोला, बाश्रीटाकळी, आकोट, तेल्हारा, बाळापूर व पातूर या सहा तालुक्यांमध्ये अतवृष्टी झाल्याचा अहवाल, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला.
** अकोल्यात ४.0२ मि.मी.पाऊस!
रविवारी जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पाऊस बरसला असून, सहा तालुक्यांमध्ये अतवृष्टीदेखील झाली. दुसर्या दिवशी सोमवारीसुद्धा जिल्हाभरात रिमझिम पाऊस सुरू होता. सोमवारी रात्री ८.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात ४.0२ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
** काटेपूर्णा ३३ टक्क्यांवर; निगरुणा १00 टक्के भरले!
रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली. त्यामध्ये निगरुणा धरण १00 टक्के भरले असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठा सोमवारी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत ३२.२६ टक्क्यांवर पोहोचला. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे.
** वाशिम पाटबंधारे विभागाची अकोल्याला सूचना !
वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी व सोनल या धरणात अनुक्रमे ७२ व ५८ टक्के वाढ झाली असून, पाऊस असाच सुरू राहिल्यास या धरणांच्या पातळीत वाढ होणार असल्याने काटेपूर्णा धरणाची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशिम पाटबंधारे विभागाने अकोला पाटबंधारे विभागाला तशी सूचना केली आहे.