सदस्यांनी बोलाविली विशेष सभा; प्रशासनाने मागितले पुरावे
By Admin | Updated: September 10, 2014 01:39 IST2014-09-10T01:39:01+5:302014-09-10T01:39:01+5:30
कंत्राटी कर्मचारी नियुक्तीवरून अकोला जिल्हापरिषदेत सत्ताधारी व प्रशासनात वादाची ठिणगी.

सदस्यांनी बोलाविली विशेष सभा; प्रशासनाने मागितले पुरावे
अकोला : राजीव गांधी पंचायत राज अभियानांतर्गत पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर कंत्राटी अभियंत्यांची पदे भरताना अनियमितता झाल्याचा आरोप करीत ही नियुक्ती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी जिल्हा परिषदेतील सत्ताधार्यांनी केली आहे. सदस्यांच्या मागणीवरून सभा बोलाविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी सभा सचिवांनी विशेष सभेची मागणी करणार्या सदस्यांनाच भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे आणि भ्रष्टाचार करणार्या अधिकारी व कर्मचार्यांची नावे सादर करण्यासाठी पत्र दिले आहे.
सदस्यांनी पंचायत अभियंत्यांचे एकूण ३७ पदे, तर गट अभियंत्यांची ७ पदे भरण्याची प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. १३ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र अध्यक्षांना देण्यात आले.
अध्यक्षांनी सदस्यांच्या मागणीवरून सभा सचिवांना विशेष सभा बोलाविण्यासाठी फाईल सादर करण्याचे आदेश शनिवारी दिले होते. सर्व १३ सदस्यांच्या नावे पत्र काढून त्यांना कंत्राटी कर्मचारी, अभियंत्यांच्या भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती सादर करण्यास सांगितले आहे.