जॉबवर्कच्या नावाखाली शेकडो तरुणांची फसवणूक
By Admin | Updated: May 24, 2014 00:08 IST2014-05-23T23:22:27+5:302014-05-24T00:08:52+5:30
बुलडाण्यातील एका जॉबवर्क सेंटरच्या संचालकांनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांना लाखो रुपयांनी गंडा घातला.

जॉबवर्कच्या नावाखाली शेकडो तरुणांची फसवणूक
बुलडाणा : कॉम्प्युटर वर्क करून द्या आणि महिना २0 हजार रुपयांपर्यंत कमवा, जॉबवर्कसाठी तुमच्याकडे कॉम्प्युटर नसल्यास सुलभ हप्त्यामध्ये कॉम्प्युटर व लॅपटॉप उपलब्ध करुन देऊ, अशी जाहिरात करुन एका जॉबवर्क सेंटरच्या पिता-पुत्रांनी जिल्हय़ातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांनी गंडा घालून पोबारा केलाचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या युवकांनी नासिर हुसैन बागवाला आणि त्याचा मुलगा युसूफ बागवाला यांच्या विरोधात शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. बेरोजगार तरूणांच्या मानसिकतेचा फायदा घेत नासीर हुसेन बागवाला (वय ५0) व त्याचा मुलगा युसूफ बागवाला (वय २७) या पिता- पुत्रांनी खामगाव रोडवर परसेप्ट कॉम्प्युटर जॉब नावाची एक फर्म सुरु केली. एका व्यक्तीकडून जवळपास ५ ते १0 हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करुन घेतली जायची. एवढय़ावरच न थांबता तुम्ही इतरांनाही हे जॉबवर्कचे काम देऊ शकता. प्रत्येक पुस्तकामागे १00 रुपये कमिशन तुम्हास देण्यात येईल, असे आमिष दाखविले जात होते. या आमिषाला भुलून अनेकांनी ६ हजारांपासून ते २४ हजारापर्यंत डिपॉझिट जमा केलेले आहे. १५ मे पर्यंत सर्वांकडून रक्कम जमा करुन घेण्यात आली व १७ मे ते २0 दरम्यान लिनोव्हा कंपनीचे कॉम्प्युटर व लॅपटॉप बुकींगनुसार वाटप करु, असे सांगून १५ मेच्या रात्री नासिर बागवाला व युसूफ बागवाला यांनी लाखो रुपये घेऊन बुलडाण्यातून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले व त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष अँड.अमोल बल्लाळ तसेच शिवसेनेचे प्रकाश देशलहरा यांच्याकडे सदर बाब सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अँड.बल्लाळ यांनी या युवकांना शहर पोलिस स्टेशनमध्ये आणून फिर्याद दाखल केली. विशेष म्हणजे एजंट म्हणून काम करणारे किरण दिनकर गवई रा.सुंदरखेड, नरेश सीताराम इंगळे रा.मोताळा यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत ७५ जणांनी आपल्या मार्फत जॉब वर्कसाठी व कॉम्प्युटरसाठी जवळपास १६ लाख रुपये डिपॉझिट म्हणून जमा केल्याचे नमूद केले आहे.