साईबाबा रूग्णालयात डॉक्टरांना मारहाण

By Admin | Updated: August 29, 2014 01:33 IST2014-08-29T00:59:49+5:302014-08-29T01:33:38+5:30

शिर्डी : साईबाबा रूग्णालयाचे हदय शल्यविशारद डॉ़ विद्युतकुमार सिन्हा यांना गुरूवारी एका रूग्णाच्या नातेवाईकाने मारहाण केली़ या प्रकाराने संतप्त झालेल्या डॉक्टर्स व रूग्णालयाच्या

Doctor at Saibaba hospital | साईबाबा रूग्णालयात डॉक्टरांना मारहाण

साईबाबा रूग्णालयात डॉक्टरांना मारहाण


शिर्डी : साईबाबा रूग्णालयाचे हदय शल्यविशारद डॉ़ विद्युतकुमार सिन्हा यांना गुरूवारी एका रूग्णाच्या नातेवाईकाने मारहाण केली़ या प्रकाराने संतप्त झालेल्या डॉक्टर्स व रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळता तब्बल तीन तास काम बंद आंदोलन केले़
संस्थान व पोलीस प्रशासनाने संबंधित आरोपीवर कारवाईचे व अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या निमित्ताने संस्थान रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़
डॉ़ सिन्हा यांनी २२ तारखेला प्रमिला राधाकिसन घाडगे (रा. मल्हारवाडी, तालुका राहुरी) या तरुणीची हदय शस्त्रक्रिया केली होती़ तिच्या हदयाला छिद्र होते़ शस्त्रक्रिया करणे धोक्याचे असल्याने अनेक ठिकाणावरुन नाकारल्याप्रमाणे येथेही नाकारण्यात आले होते़मात्र वारंवार विनंती करणारे नातेवाईक धोका पत्करण्यास तयार झाल्याने, तसे लेखीही दिल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी या तरुणीचा मृत्यू झाला़याचा राग धरुन राजेंद्र घाडगे हा रुग्णालयात आला़ शस्त्रक्रिया कक्षा बाहेरील डॉक्टर्स रूम मध्ये चर्चा करत असतानाच त्याने डॉक्टरांना मारहाण करून पळ काढला़ या घटनेने आरडाओरड झाली मात्र सुरक्षा रक्षकांनी तातडीने कारवाई न केल्याने तो पळ काढण्यात यशस्वी झाला़ या घटनेचे वृत्त समजताच नगराध्यक्षा अनिता जगताप, उपनगराध्यक्ष निलेश कोते, शिवसेनेचे तालुका प्रमुख कमलाकर कोते, शिवाजी गोंदकर, विजय जगताप, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी तातडीने रूग्णालय गाठुन डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना धीर देत त्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहण्याची ग्वाही दिली़
अशा घटना रूग्णालयात वारंवार घडत असल्याने सुरक्षेच्या मुद्द्यावर कर्मचाऱ्यांनी तातडीने काम बंद करण्याचा निर्णय घेतला़ दरम्यान संस्थान व्यवस्थापनाची नगरला बैठक असल्याने अधिकारी जागेवर नव्हते़ पोलीसही तब्बल दोन तासांनी आले़ यावेळी झालेल्या सभेत डॉ़ संजय पठारे, डॉ़ हरिष बजाज, थॉमस गायकवाड, मंदा थोरात, सुरय्या पठाण आदींनी घटनेचा निषेध केला़ आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करतानाच अशा घटना सातत्याने घडत असल्याने व सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद असल्याचे निदर्शनास आणले़
यावर प्रशासकीय अधिकारी गमे व रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ़ राव यांनी सुरक्षा वाढवण्याचे व कॅमेरे बसवण्याचे तर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आरोपीला तत्काळ पकडून त्याच्यावर वैद्यकीय सेवा संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आश्वासन दिले़ यावेळी डॉ, मखवाना, डॉ़ वर्मा, डॉ. खुराणा, डॉ़ म्हात्रे, डॉ़ मुंदडा, डॉ़ व्यवहारे, डॉ़ शिंदे, डॉ़ नरोडे, डॉ़ जपे, डॉ़ मेहेत्रा, डॉ़ तुपे, जनसंपर्क अधिकारी वाळुंज यांच्यासह परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Doctor at Saibaba hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.