सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक
By Admin | Updated: May 15, 2014 23:21 IST2014-05-15T21:38:08+5:302014-05-15T23:21:31+5:30
मुंब्रा येथील सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता नसतानाही महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्याचे समोर आले आहे.

सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक
सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक
मान्यता नसताना विद्यार्थ्यांना दिले प्रवेश : विद्यार्थ्यांचे वर्ष वाया
मुंबई :
मुंब्रा येथील सेंट मेरी डिग्री महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता नसतानाही महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी घेतलेली कागदपत्रे आणि पैसेही परत देण्यास नकार दिल्याने पालक हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी पालक पोलिस ठाण्यात धाव घेणार आहेत.
सेंट मेरी डिग्री महाविद्यालय गेल्या शैक्षणिक वर्षापासून खौसा मुंब्रा येथे सुरु करण्यात आले. परंतू महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रशासनाने विद्यापीठाकडून मान्यताच घेतली नाही. असे असतानाही महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेशही दिले. येथे कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखा सुरु करण्यात आल्या. कला आणि वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांकडून खूपच कमी प्रतिसाद मिळाल्याने महाविद्यालयाने या शाखा सुरु केल्या नाहीत. मात्र, एफ.वाय.बी.कॉमसाठी सुमारे २५ विद्यार्थी आल्याने महाविद्यालयाने एफ.वाय.बी.कॉमच्या वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मात्र, विद्यापीठाकडून या अभ्यासक्र्रमाला मान्यताच नसल्याने महाविद्यालयाने पहिल्या सत्राची परीक्षा डिसेंबर महिन्यात घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत नसल्याने पालकांनी महाविद्यालयाकडे विचारणा केली. तेव्हा महाविद्यालयाने प्रवेशासाठी दिलेली कागदपत्रे परत घेऊन जाण्यास सांगितले.
याबाबत पालकांनी विद्यापीठाकडे धाव घेतली. मात्र, विद्यापीठाने या महाविद्यालयाला मान्यताच दिली नसल्याने महाविद्यालयावर कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश देतेवेळी पालकांना कोणतीही याबाबतची कोणतीही सुचना दिली नव्हती. यामुळे पालकांनीही महाविद्यालयावर विश्वास ठेवत विद्यार्थ्यांचे प्रवेश निित केले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरल्यानंतर दिलेल्या पावतीमध्ये महाविद्यालयाला विद्यापीठाची मान्यता असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे आम्ही या महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, आता महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा घेण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. महाविद्यालयाकडून आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर पालक पोलिसांकडे लवकरच दाद मागणार आहेत.
महाविद्यालाने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून साडे चार हजार रुपये शुल्क घेतले होते. मात्र, हे शुल्कही परत देण्यास महाविद्यालयाने नकार दिला असल्याचे, एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
महाविद्यालयाला विद्यापीठाकडून मंजूरी घेण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने महाविद्यालयाला मंजूरी दिलेली नाही. यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. यासाठी विद्यार्थ्यांची घेतलेली कागदपत्रे आणि शुल्क परत देण्यात आले असून आता कोणतीही समस्या नसल्याचे, महाविद्यालयाच्या प्राचार्या तेलिलका यांनी सांगितले.