‘झेडपी’, ‘एमजीपी’कडून टोलवाटोलवी !

By Admin | Updated: April 18, 2017 23:42 IST2017-04-18T23:41:41+5:302017-04-18T23:42:15+5:30

उस्मानाबाद : थकित वीजबिलामुळे महावितरणने योजनेचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी खंडित केले. त्यामुळे प्रकल्प उशाला असूनही चारही गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत.

'ZP', 'MGP' towel! | ‘झेडपी’, ‘एमजीपी’कडून टोलवाटोलवी !

‘झेडपी’, ‘एमजीपी’कडून टोलवाटोलवी !

उस्मानाबाद : गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तेरणा प्रकल्प तुडूंब भरला. याच प्रकल्पावरून तेरसह ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत ही योजना बंद होती. थकित वीजबिलामुळे महावितरणने योजनेचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी खंडित केले. त्यामुळे प्रकल्प उशाला असूनही चारही गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. ही योजना चालविण्यास असमर्थता दर्शवित जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून घ्यावी, अशी भूमिका ‘एमजीपी’ने घेतली आहे. तर दुसरीकडे योजना हस्तांतरित करून घेण्यास जिल्हा परिषद नकार देत आहे. दोन्ही यंत्रणेच्या टोलवाटोलवीमुळे ग्रामस्थांचे मात्र नाहक हाल होत आहेत.
येडशी, तेर, ढोकी आणि कसबे तडवळे या गावांना कामयमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. सुमारे १६ कोटी ९ लाख रूपये तरतूद केली होती. जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या योजनेचे काम २००५ मध्ये पूर्ण करण्यात आले. सन २०१३ पर्यंत जीवन प्राधिकरणकडून ही योजना चालविण्यात आली. याच कालावधीत भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तेरणा प्रकल्प कोरडठाक पडला. त्यामुळे उपरोक्त चारही गावांचा पाणीपुरवठा बंद होता. दरम्यानच्या काळात पाणी योजनेचे विद्युतबिलही मोठ्या प्रमाणात थकले होते. ही रक्कम सुमारे १ कोटी ३० लाखांच्या घरात आहे. वारंवार मागणी करूनही वीजबिलाचा भरणा न केल्यामुळे महाविरणकडून योजनेचा विद्युतपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. तेव्हापासून ही योजना बंदच आहे. दरम्यान, ही योजना सुरू करण्याच्या अनुषंगाने ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरवा करण्यात येत आहे. परंतु, जीवन प्राधिकरणने ही योजना जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून घ्यावी, अशी भूमिका घेतली आहे. शासनाच्या मंजुरीशिवाय आम्ही योजना सुरू करू शकत नाही, असे प्राधिकरणचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेनेही कणखर भूमिका घेतली आहे. काही वर्ष पाणीपुरवठा योजना बंद राहिल्याने प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणने किमान सहा महिने योजना चालवावी, त्यानंतरच हस्तांतरित करून घेवू, असा स्टॅन्ड घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण यांच्यातील ही टोलवाटोलवी ग्रामस्थांच्या मुळावर आली आहे. धरणामध्ये पाणी असूनही पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे विहीर, बोअरसारखे जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडत आहेत. त्यामुळेच सध्या उपरोक्त चारही गावांतून टँकरसह अधिग्रहणाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे धडकू लागले आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे ही योजना जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून घेवून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'ZP', 'MGP' towel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.