जि.प. अध्यक्षपदी मिलिंद लातुरे
By Admin | Updated: March 22, 2017 00:18 IST2017-03-22T00:17:57+5:302017-03-22T00:18:52+5:30
लातूर : भाजपाने लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर मिलिंद लातुरे यांची तर उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची निवड केली.

जि.प. अध्यक्षपदी मिलिंद लातुरे
लातूर : ३५ वर्षाच्या काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावलेल्या भाजपाने लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे सामान्य शेतकरी असलेले मिलिंद लातुरे यांची तर उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची निवड केली. अध्यक्षपदाच्या शर्यतीत शेवटपर्यंत चर्चेत असलेल्या प्रकाश देशमुख यांची सभागृह गटनेतेपदी निवड झाली. बहुमत असूनही कमालीची गोपनियता बाळगत भाजपाने अगदी शेवटच्या क्षणी या निवडीच्या घोषणा केल्या. लातूर जिल्हा परिषदेत भाजपाला स्पष्ट बहुमत होते. ५८ पैकी त्यांच्याकडे स्वत:चे ३६ तर एका अपक्षाच्या पक्षप्रवेशाने ३७ चे संख्याबळ होते. त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची फक्त औपचारिकता बाकी होती. पालमकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत सकाळी ‘कॉर्निव्हल’मध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली.
यावेळी आ. सुधाकर भालेराव, आ. विनायकराव पाटील, रमेश कराड, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हाध्यक्ष नागनाथ अण्णा निडवदे आदींचीही उपस्थिती होती. अनेक इच्छुकांच्या नावावर चर्चा झाल्या. मात्र सर्वानुमते अध्यक्षपदासाठी मिलिंद लातुरे यांचे तर उपाध्यक्षपदासाठी रामचंद्र तिरुके यांचे नाव ठरले. तिरुके हे मावळत्या सभागृहात भाजपाचे गटनेते होते. विरोधी पक्षाची धार त्यांनी मोठी केली होती. जिल्हा परिषदेच्या कामाचा त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. यामुळेच त्यांच्याकडे उपाध्यक्षपद दिले गेले.
या दोघांनीही दुपारी साडेबारा वाजता आपापल्या उमेदवारीचे अर्ज भरले. काँग्रेसने उमेदवारी अर्जच न भरल्याने या दोघांच्या निवडीची औपचारीक घोषणा झाली. त्यानंतर नूतन अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत पदभार घेतला. यावेळी भाजपाचे सर्व सदस्य उपस्थित होते.