जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज होणार निवड
By Admin | Updated: March 20, 2017 23:42 IST2017-03-20T23:40:21+5:302017-03-20T23:42:19+5:30
लातूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे

जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज होणार निवड
लातूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. दरम्यान, नवनिर्वाचित सदस्यांची पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार पालकमंत्र्यांना दिले.
जि.प.त भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत असून, ५८ पैकी ३६ जागा जिंकून एकहाती सत्ता आणली आहे. त्यातच अपक्ष म्हणून निवडून आलेल्या वांजरवाडा गटातील अनिता परगे यांनी भाजपात प्रवेश केल्याने आता संख्याबळ ३७ वर आले आहे. तथापि, जि.प. मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत असले, तरी अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीतही अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर चर्चा झाली नाही. सदस्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ठरविण्याचा अधिकार पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दिला आहे. त्यांनीही या बैठकीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार ठरविला जाईल, असे सांगितले. लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाची दीर्घकाळ सत्ता होती. ही सत्ता उलथवून भाजपाने कमळ फुलविले आहे. तब्बल ३६ जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेस पक्षाला केवळ १५ जागा मिळविता आल्या आहेत. ज्याच्या मनगटात नांगर धरण्याची क्षमता असेल असाच सदस्य अध्यक्ष होईल, असे प्रचार काळात घोषित केले होते. मात्र प्रत्यक्षात शेतीत राबणारा शेतकरी सदस्य नसला तरी बांधावरचे शेतकरी असलेले अनेक जण सदस्य झाले आहेत. त्यामुळे अध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. जि.प.तील अनुभवी व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून रामचंद्र तिरुके यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. पण अध्यक्षपद खुल्या वर्गाला सुटले आहे. खुल्या वर्गाला डावलून ओबीसीला अध्यक्षपद बहाल केल्यास अन्याय होईल, अशी दबक्या आवाजात सदस्यांमध्ये चर्चा आहे.