जिल्हा परिषदेच्या चाव्या युतीकडे
By Admin | Updated: March 21, 2017 23:56 IST2017-03-21T23:46:53+5:302017-03-21T23:56:04+5:30
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत माजी मंत्री सुरेश धस यांच्या पाठिंब्याच्या जोरावर युद्धात हारलेल्या भाजपने तहात बाजी मारुन जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावला.

जिल्हा परिषदेच्या चाव्या युतीकडे
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फायदा घेत माजी मंत्री सुरेश धस यांच्या पाठिंब्याच्या जोरावर युद्धात हारलेल्या भाजपने तहात बाजी मारुन जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावला. परळीत झालेल्या भाजपचा दारुण पराभव धुवून काढत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बेरजेचे राजकारण करुन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार हादरा दिला. अध्यक्षपदी भाजपच्या सविता विजय गोल्हार तर उपाध्यक्षपदी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या जयश्री राजेंद्र मस्के यांची वर्णी लागली.
कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषदेच्या सत्तेचा रिमोट कोणाकडे जातो? याची संपूर्ण जिल्ह्याला मोठी उत्कंठा होती. मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून वेगवान राजकीय घडामोडी झाल्या. माजी मंत्री सुरेश धस विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व आ. अमरसिंह पंडित यांच्यात गेल्या काही दिवसांत मतभेद होते. त्याचा बरोबर फायदा घेत पंकजा मुंडे यांनी त्यांना गळाला लावले. शिवाय शिवसंग्राम व शिवसेनेच्या प्रत्येकी चार सदस्यांचीही त्यांनी मदत घेतली. त्यामुळे युतीचे संख्याबळ ‘मॅजिक फिगर’पेक्षाही अधिक ३४ इतके झाले. दुसरीकडे आ. जयदत्त क्षीरसागर गटाच्या सदस्या मंगल डोईफोडे या गैरहजर राहिल्या. शिवाय काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे हक्काचे दोन सदस्य कमी झाले. परिणामी राकॉला केवळ २० सदस्यांवर समाधान मानावे लागले.
सकाळी ११ वाजता शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पालकमंत्री पंकजा मुंडे, आ विनायक मेटे, राकॉचे फुटीर नेते सुरेश धस, शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख हे नेते एकत्रित आले. त्यांनी बंद दरवाजाआड अर्धा तास गुफ्तगू केले. यावेळी भाजप व मित्रपक्षांचे सदस्यांचा ताफाही तेथे दाखल झाला. पाठोपाठ धस गटाचे सदस्य हेलिकॉप्टरद्वारे पुण्याहून बीडला पोहचले. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे कोणाचे नाव निश्चित करायचे? यावरुन बरीच खलबते झाल्यानंतर आष्टी तालुक्यातील धामणगाव गटातून निवडून आलेल्या भाजपच्या सविता विजय गोल्हार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उपाध्यक्षपदाकरिता शिवसेनेचे युद्धजित पंडित यांचे नाव निश्चित होते; परंतु गेवराईचे भाजपचे आ. लक्ष्मण पवार यांनी त्यांना विरोध केला. एवढेच नाही तर त्यांनी बैठकीतून ‘वॉक आऊट’ केले. यावेळी पालकमंत्री पंकजा यांनी त्यांना परत बोलावले. माजी मंत्री बदामराव पंडित यांचीही मनधरणी केली अन् ऐनवेळी लिंबागणेश गटातून जि. प. गाठणाऱ्या शिवसंग्रामच्या जयश्री राजेंद्र मस्के यांचे नाव निश्चित झाले.
इकडे धैर्यशिल सोळंके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व काकू- नाना आघाडीचे सदस्य एकत्रित आले होते. माजी मंत्री प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, अशोक डक, धैर्यशिल सोळंके, संजय दौंड, प्रा. टी. पी. मुंडे ही मंडळी रणनीती आखत होती. भाजप उपाध्यक्षपद देत नसेल तर आमच्यासोबत या... असा प्रस्ताव माजी मंत्री सोळंके यांनी बदामरावांपुढे भ्रमणध्वनीवरुन ठेवला. मात्र, बदामरावांनी पुत्र युद्धजित यांचा उपाध्यक्षपदाचा पत्ता कापूनही युतीधर्म पाळत भाजपचीच साथ निभावली.
दुपारी १ वाजता युती व आघाडीचे सदस्य गटागटाने नगर रोडवरील सामाजिक न्याय भवनात दाखल झाले. अध्यक्षपदासाठी भाजपकडून सविता गोल्हार, उपाध्यक्षपदासाठी शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांनी उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादीकडून मंगल प्रकाश सोळंके यांनी अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदाकरिता शिवकन्या सिरसट यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी होता. कोणीच माघार न घेतल्याने शेवटी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात युतीला ३४ तर राष्ट्रवादी व मित्रपक्षाला २० मते मिळाली. राकॉच्या पिंपळनेर गटातील आ. जयदत्त क्षीरसागर गटाच्या सदस्या मंगल डोईफोडे यांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवली. त्यामुळे ५९ सदस्यांनीच मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
सविता गोल्हार व जयश्री मस्के यांची अनुक्रमे अध्यक्ष- उपाध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काम पाहिले. विजयाची घोषणा होताच भाजप, सेना व शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)