जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या आज निवडी !
By Admin | Updated: March 24, 2017 00:39 IST2017-03-24T00:35:39+5:302017-03-24T00:39:45+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर शुक्रवारी विषय समिती सभापतींच्या निवडी केल्या जाणार आहेत.

जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या आज निवडी !
उस्मानाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर शुक्रवारी विषय समिती सभापतींच्या निवडी केल्या जाणार आहेत. भाजपाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर आपले उमेदवार विराजमान केले. त्यामुळे भाजपाला दोन सभापतीपदे दिली जाणार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्याही दोघांना संधी दिली जाणार असल्याचे समजते.
जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक २६ जागा जिंकत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. परंतु, बहुमतासाठी दोन जागा कमी पडल्या. तर दुसरीकडे काँग्रेसने १३ आणि शिवसेनेला ११ जागा मिळाल्या. काँग्रेस-शिवसेनेला बहुमतासाठी चार जागा कमी होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेना-काँग्रेसकडून सत्तेसाठी जोरदार फिल्डींग लावण्यात आली होती. परंतु, यात राष्ट्रवादीने आघाडी घेत भाजपाच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्षपदी नेताजी पाटील तर उपाध्यक्षपदी अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना विराजमान केले. भाजपाचे चार आणि शिवसेनेचे दोन असे सहा सदस्य मतदानावेळी गैैरहजर राहिले. परिणामी राष्ट्रवादीचा मार्ग सुखकर झाला. त्यामुळे आता भाजपाला दोन सभापती पदे दिली जाणार आहेत. यामध्ये उमरगा तालुक्यातील तुरोरी मतदार संघातून विजयी झालेले अॅड. अभय चालुक्य यांच्यासह परंडा तालुक्यातील शेळगाव येथील सदस्याचे नाव चर्चेत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोघांना संधी दिली जाणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांच्यासह अन्य एका सदस्याचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अधिक होती. परंतु, ऐनवेळी अनपेक्षित नावे समोर आल्याने काहींच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. असे असतानाच आता सभापती पदासाठीही इच्छुकांची संख्या अधिक आहे. चार पैैकी दोन पदे भाजपाला द्यावी लागणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे दोन सभापतीपदे येतील. परंतु, इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पक्ष श्रेष्ठीला नाराजांची मनधनरणी करावी लागणार आहे. दरम्यान, सभापती पदाच्या निवडीवेळी दगाफटका होवू नये, यासाठी खबरदारीचा भाग म्हणून राष्ट्रवादीने सर्व सदस्य सहलीवर पाठविले आहेत. हे सदस्य शुक्रवारी सकाळी उस्मानाबादेत दाखल होत आहेत.