वीज जोडणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनाच करावे लागले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:35+5:302020-12-17T04:26:35+5:30

--- औरंगाबाद : महावितरणकडे वारंवार विनंत्या करूनही वरझडी येथील दोन तांड्यांवर वीज जोडणीचा प्रश्न सुटत नसल्याने शेवटी जिल्हा परिषद ...

Zilla Parishad president had to go on a hunger strike for power connection | वीज जोडणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनाच करावे लागले उपोषण

वीज जोडणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनाच करावे लागले उपोषण

---

औरंगाबाद : महावितरणकडे वारंवार विनंत्या करूनही वरझडी येथील दोन तांड्यांवर वीज जोडणीचा प्रश्न सुटत नसल्याने शेवटी जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामराव शेळके यांच्यासह ग्रामस्थांना उपोषणाला बसावे लागले. तेव्हा महावितरणला जाग आली अन् अधिकाऱ्यांनी ७ दिवसांत वीज जोडणी करू, असे लेखी आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

महाविकास आघाडीची सत्ता, मुख्यमंत्री शहर दौऱ्यावर असताना जिल्हा परिषद अध्यक्षा रस्त्यावर उपोषणाला बसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला. जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामराव शेळके यांनी ११ नोव्हेंबरला वरझडी येथील बंधू नाईक तांडा, दिघा तांडा येथील रहिवाशांना वीजजोडणी द्यावी, अशी दोन स्वतंत्र निवेदने महावितरण ग्रामीण परिमंडळ १ च्या कार्यकारी अभियंत्यांना दिली होती. त्यानंतर भेट घेऊनही विनंती करण्यात आली. त्यानंतर उपोषणाचा इशाराही दिला. मात्र, गेल्या महिनाभर कोणतीच कार्यवाही झाली नाही.

अखेर जि. प अध्यक्षा मीना शेळके, तालुकाध्यक्ष शेळके हे ग्रामस्थांसह शनिवारी सकाळी चिकलठाणा येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर उपोषणाला बसले. काही मिनिटांतच अधीक्षक अभियंता संजय अकोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन ७ दिवसांत ग्रामस्थांना वीज जोडणी देण्याचे काम पूर्ण होईल, असे पत्र दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

--

पत्र दिल्यावर सुटले उपोषण

---

महिनाभरापूर्वीच भारत इलेक्ट्रिकल, सांगली या कंपनीला हे काम देण्यात आले होते; परंतु दिवाळीमुळे कंपनीचे कामगार गावी परतले होते. त्यामुळे काम होऊ शकले नाही. भांबर्डा सबस्टेशनवर कामासाठी लागणारे सर्व साहित्य पोचवण्यात आले असून शुक्रवारी काम सुरू झाले आहे. पुढील सात दिवसांत बंधू नाईक तांडा, दिघा तांडा येथील ग्रामस्थांना वीज जोडणी दिली जाईल, असे महावितरणकडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

--

फोटो ओळ : चिकलठाणा येथील महावितरणच्या कार्यालयासमोर जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामराव शेळके यांच्यासह ग्रामस्थांना उपोषण सोडवण्यासाठी पत्र देताना महावितरणचे अधिकारी व पोलीस अधिकारी.

Web Title: Zilla Parishad president had to go on a hunger strike for power connection