सभेवरून रंगले जिल्हा परिषदेचे राजकारण
By Admin | Updated: August 14, 2014 01:55 IST2014-08-14T01:12:04+5:302014-08-14T01:55:37+5:30
संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेची विशेष सभा १९ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेवरूनच सत्ताधारी आणि विरोधी मंडळींमधील राजकारण रंगू लागले असून

सभेवरून रंगले जिल्हा परिषदेचे राजकारण
संजय कुलकर्णी , जालना
जिल्हा परिषदेची विशेष सभा १९ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेवरूनच सत्ताधारी आणि विरोधी मंडळींमधील राजकारण रंगू लागले असून सभा विशेष की सर्वसाधारण यावरून दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. या राजकारणात प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच करमणूक होत आहे.
३१ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभा विरोधकांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे चर्चेविनाच संपली. २७ मे रोजी झालेल्या सभेतील पाणीटंचाईच्या चर्चेचे अनुपालन या सभेत का नाही, असे म्हणत तेव्हा विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चा व्हावी, हाच विरोधकांचा सूर होता. त्यासाठी काहींनी तर फर्निचरची मोडतोडही केली. प्रोसेडिंग बुक पळविण्याचा प्रयत्न झाला. तर सत्ताधारी मंडळींनीही ‘सर्व विषय मंजूर...मंजूर’ अशी जोरजोराने घोषणाबाजी करत सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर या मंडळींनी पत्रकार परिषदांमधून आरोप-प्रत्यारोप केले.
सभेच्या विषयपत्रिकेतील आयत्या वेळच्या विषयांसह एकूण ३० विषय मंजूर झाल्याचा दावा सत्ताधारी मंडळींनी केला. तर सभेत कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही व सभा सुरू ठेवण्यासाठी आम्ही मतदानाची मागणी करून देखील ती पूर्ण झाली नाही, असे सांगत ही सभा तहकूब झाली, असा दावा विरोधी सदस्यांनी केला. सर्वसाधारण सभेचा समारोप ‘वंदे मातरम्’ गिताने होतो, मात्र हे गीत सादर न झाल्याने सभा झालीच नाही, अशी पुष्टीही विरोधकांनी जोडली.
या पार्श्वभूमीवर स्वत: अध्यक्षांनी १९ आॅगस्ट रोजी विशेष सभा होणार असल्याचे सर्व पदाधिकारी, सदस्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यासाठीची पूर्वसूचना सभेच्या १० दिवसांअगोदर सर्वांना पाठविण्यात आली आहे. मात्र या सभेत ३१ जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेतीलच सर्व विषय चर्चेसाठी ठेवण्यात आल्याने ही तहकूब झालेली सभा आहे की, विशेष सभा असा संभ्रम प्रशासनातीलच काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
कारण सत्ताधारींच्या दाव्यानुसार सभेतील विषय जर पूर्वीच मंजूर झालेले असतील तर केवळ चर्चा करण्यासाठी विरोधक तयारी दाखवितील का, आणि विरोधकांच्या दाव्यानुसार ३१ जुलै रोजीची सभा तहकूब झाल्यानेच आता पुन्हा सभा बोलावून त्यास विशेष सभा असे नाव दिले गेले. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांच्या या दावे-प्रतिदाव्यांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीची रंगीत तालिम सुरू झाल्याची चर्चाही जिल्हा परिषदेच्या आवारात होत आहे.