जिल्हा परिषदेत आता कामांची लगबग वाढली
By Admin | Updated: October 27, 2016 00:52 IST2016-10-27T00:37:17+5:302016-10-27T00:52:26+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन वर्षात होणे अपेक्षित असून, तीन ते चार महिन्यांत जेवढी कामे होतील, ती करून घेण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांची लगबग सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेत आता कामांची लगबग वाढली
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन वर्षात होणे अपेक्षित असून, तीन ते चार महिन्यांत जेवढी कामे होतील, ती करून घेण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांची लगबग सुरू झाली आहे. ५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीसाठी सर्कलनिहाय सामाजिक आरक्षण, प्रवर्गनिहाय सोडत निघाल्यापासून सदस्यांची विभागात धावपळ वाढली आहे.
विविध योजनेंतर्गत विकासकामांसाठी आलेल्या निधीतून सर्कलमध्ये विकासकामे करून घेतल्यास निवडणुकीत फायदा होईल. त्या अनुषंगाने पदाधिकारी आणि सदस्यांनी संचिकांचा पाठपुरावा सुरू केला आहे. बुधवारी जिल्हा परिषद आवारात सदस्य आणि त्यांच्याशी निगडितांनी विभागातील संचिका कुठे आहे. याचा आढावा घेण्यासाठी गर्दी केली होती. समाजकल्याण विभागाकडे आलेल्या निधीचे कशा प्रमाणात वाटप झाले आहे, याची माहिती अनेकांनी विभागात येऊन घेतली. तसेच बांधकाम विभागातही संचिकांसाठी गर्दी होती. येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या वाढली आहे.
सोयगाव, फुलंब्री, सातारा-देवळाई हे गट कमी झाले तर पैठण, वैजापूर, औरंगाबाद, गंगापूर तालुक्यात गट वाढले. कन्नडमधील एक गट कमी झाला. सातारा-देवळाई हे गट मनपात विलीन झाल्यामुळे पंढरपूर आणि आडगाव या गटांमध्ये मनपा हद्दीबाहेरील गावे जोडली आहेत. वडगाव आणि वडगाव-कोल्हाटी हा गटदेखील नव्याने तयार झाला आहे. या रचनेनुसार विकासकामे करून घेण्यासाठी सदस्यांनी तयारी सुरू केली आहे.