जिल्हा परिषद सदस्यही गेले सहलीवर
By Admin | Updated: September 14, 2014 23:57 IST2014-09-14T23:53:41+5:302014-09-14T23:57:10+5:30
जालना : पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडीपाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद सदस्यही गेले सहलीवर
जालना : पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडीपाठोपाठ आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी सायंकाळी काही जि.प. सदस्य सहलीवर गेले आहेत.
विद्यमान जि.प. सदस्यांच्या अडीच वर्षांचा कार्यकाळ अद्याप बाकी आहे. दुसऱ्या टर्मच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. विधानसभा निवडणुका एक महिन्यावर आलेल्या असल्याने या निवडणुकीला राजकीय वर्तुळात महत्व प्राप्त झाले आहे. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. शिवसेना-भाजपा युतीचे अपक्षांसह ३३ इतके संख्याबळ असले तरी युतीमध्ये अध्यक्ष कुणाच्या पक्षाचा होणार, याविषयीचा निर्णय अद्याप निश्चित झालेला नसल्याचे कळते.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकूण १८ सदस्य आहेत. मनसेच्या एकमेव सदस्यांचे त्यांना समर्थन आहे. सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस आघाडीला मोठे संख्याबळ लागत असल्याने त्यांना फोडाफोडीचे राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्याने या फोडाफोडीचा प्रयत्न फारसा यशस्वी होणार नाही, अशीही शक्यता आहे. शिवसेना व भाजपामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या यावेळी अधिक आहे. परंतु दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमार्फत काहींचे मन वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)