जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आज ठरणार !
By Admin | Updated: March 20, 2017 23:22 IST2017-03-20T23:22:04+5:302017-03-20T23:22:36+5:30
जालना : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवडणूक होत आहे.

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आज ठरणार !
जालना : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवडणूक होत असून, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे अवघ्या जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे २२, शिवसेना १४, राष्ट्रवादी काँग्रेस १३, काँग्रेस ५ आणि अपक्ष दोन सदस्य निवडून आले आहेत. सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या असल्या तरी बहुमतापासून ७ जागा दूर असल्याने चुरस निर्माण झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी विविध राजकीय आयुधांचा वापर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भाजपाची घौडदौड रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगे्रसचे नेते एकत्र आल्याची चर्चा गत काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे. या नेत्यांमध्ये आघाडी करण्याबाबत प्राथमिक चर्चाही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दक्षता म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.
हे सर्व सदस्य मतदानाच्या वेळी सभागृहात अवतरणार आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजपा नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, संपूर्ण राजकीय अनुभव या नेत्यांनी पणाला लावला आहे. आपल्या राजकीय ‘पॉकेटस्’ला धक्का न लागता राजकीय समीकरणे जूळवून आणण्यासाठी सोमवारी रात्री उशिरापर्यंत नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह कोअर कमिटीची बैठकही झालेली आहे. या बैठकीतील तपशील कळू शकला नसला तरी मुंबईतून सूत्रे हलली तर राजकीय चमत्कार होण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधत सत्ता स्थापण्याच्या दिशेने हालचाली सुरु केल्या.
रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडींनी वेग घेतला होता. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे या निवडणुकीत काय चमत्कार घडवून आणतात याकडे राजकीय तज्ज्ञांचेही लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर कोणती राजकीय खेळी खेळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.