जिल्हा परिषद पुन्हा युतीच्या ताब्यात
By Admin | Updated: September 22, 2014 00:54 IST2014-09-22T00:41:19+5:302014-09-22T00:54:00+5:30
जालना : बहुमताच्या जोरावर जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात राहिली असून अध्यक्षपदी भाजपाचे तुकाराम जाधव तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर हे ३४ विरुद्ध १५ मतांच्या फरकाने

जिल्हा परिषद पुन्हा युतीच्या ताब्यात
जालना : बहुमताच्या जोरावर जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात राहिली असून अध्यक्षपदी भाजपाचे तुकाराम जाधव तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर हे ३४ विरुद्ध १५ मतांच्या फरकाने विजयी झाले. या दोन्ही पदांसाठीचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुक्रमे अॅड. पंकज बोराडे व अॅड. संजय काळबांडे यांना प्रत्येकी १५ मते मिळाली.
जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी बी.एल. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपस्थित सदस्यांचे हात उंचावून मतदान घेऊन ही निवड प्रक्रिया पार पडली. सकाळी ११ वाजता सदस्यांना अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज देण्यास सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. २ वाजता विशेष सभेला प्रारंभ झाला. त्यात प्रारंभी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष पदासाठी सेनेकडून अनिरुद्ध लक्ष्मणराव खोतकर, भाजपाकडून तुकाराम गोविंदा जाधव तर राष्ट्रवादीकडून अॅड. पंकज बोराडे यांनी अर्ज दाखल केले. उपाध्यक्षपदासाठी अनिरुद्ध खोतकर व राष्ट्रवादीचे अॅड. संजय संपतराव काळबांडे यांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी अध्यक्षपदासाठीचा अर्ज खोतकर यांनी मागे घेतला. त्यामुळे दोन्ही पदांसाठी सरळ लढत झाली.
शिवसेना-भाजपा युतीचे बहूमत असल्याने या पक्षाचे प्रत्येकी १५ असे एकूण ३० व त्यांना पाठिंबा असलेले चार अपक्ष असे ३४ संख्येचे बलाबल होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्य असले तरी विमल खैरे या सदस्य आजारी असल्याने हजर नव्हत्या. राकाँच्या आघाडीतील काँग्रेसचे एल.के. दळवी, जिजाबाई गवळी, नरसिंग राठोड व मूळ काँग्रेसचे परंतु अपक्ष म्हणून विजयी झालेले राजेश राठोड हे चारही जण गैरहजर होते. तसेच या आघाडीला पाठिंबा दिलेले मनसेचे रवि राऊत हे देखील गैरहजर होते. त्यामुळे या निवडणुकीत राकाँ उमेदवारांना १५ मते मिळाली.
मतदान प्रक्रियेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षातील सदस्यांसाठी काढलेला व्हीप पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहात वाचून दाखविला. सेना-भाजपाने मात्र व्हीप काढलेला नव्हता. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवाजी चोथे, बबनराव लोणीकर, विष्णू पाचफुले आदी उपस्थित होते.
पीठासीन अधिकाऱ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, सोनवणे, वाघचौरे, रवि कांबळे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)