जिल्हा परिषद घेणार मालमत्तांचा शोध

By Admin | Updated: July 25, 2014 00:49 IST2014-07-25T00:39:23+5:302014-07-25T00:49:05+5:30

औरंगाबाद : मालकीच्या जागा, इमारती, अखत्यारीतील रस्ते आदींपासून अनभिज्ञ असलेल्या जिल्हा परिषदेला उशिरा का होईना जाग आली आहे.

Zilla Parish will conduct research on properties | जिल्हा परिषद घेणार मालमत्तांचा शोध

जिल्हा परिषद घेणार मालमत्तांचा शोध

औरंगाबाद : मालकीच्या जागा, इमारती, अखत्यारीतील रस्ते आदींपासून अनभिज्ञ असलेल्या जिल्हा परिषदेला उशिरा का होईना जाग आली आहे. आपल्या मालमत्ता शोधून काढून त्यांची नोंद घेण्यासाठी येत्या ८ आॅगस्टपासून जिल्ह्यात मालमत्ता विकास अभियान राबविले जाईल.
जि. प. च्या मालकीच्या जागा, इमारतीवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे होत आहेत. जि. प. ने घेतलेली विकासकामे अनेकदा खाजगी जागेत झाल्याचे प्रकारही समोर आले. जि. प. ला आपली मालमत्ता कोणती व कोठे आहे, हे ओळखता यावे, त्यांचे अभिलेखे ताब्यात असावेत, असा प्रयत्न आता जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. त्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची बैठक उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी गुरुवारी
घेतली.
यश मिळाले तरीही...
ग्रामपंचायतीच्या थकित कर वसुलीसाठी सोळंके यांनी कर वसुली अभियान राबवून मोठ्या प्रमाणात कर वसुली करून ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या भरल्या होत्या. परंतु त्यानंतर अचानक हे अभियान थंडावले. सर्वसामान्य करदात्यांकडून वसुली केल्यानंतर बड्या कर थकबाकीदारांना अभय देण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा जि. प. सदस्यांत सुरू होती.
अभियान राबविणार
८ आॅगस्टपासून मालमत्ता विकास अभियान आम्ही राबविणार आहोत. त्यात तीन रजिस्टर (क्र.२२, २३, २४) असतील. सहान जागा, बांधकामे व इमारती आणि रस्ते यासाठी एक स्वतंत्र रजिस्टर करून त्यात नोंदी घेतल्या जातील. संबंधित मालमत्तेचे सर्व अभिलेखे जमा केले जातील.
-वासुदेव सोळंके,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी.
प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे
जिल्हा परिषदेच्या मालमत्ता सध्या कुठेच सुरक्षित नाहीत. जि. प. च्या औरंगपुऱ्यातील जागेचा न्यायालयात वाद सुरू आहे. अनेक प्रकरणांत सुनावणीला जि. प. तर्फे कुणी जात नाही. या मालमत्ता सुरक्षित कराव्यात, सोबतच चांगले विधिज्ञ नेमून न्यायालयात दाद मागावी. दस्तावेज मिळवावा. दस्तावेज गहाळ कसे होतात, याची जबाबदारी निश्चित करावी.
-रामदास पालोदकर,
जि. प. सदस्य.

Web Title: Zilla Parish will conduct research on properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.