गैरव्यवहाराच्या आरोपावरुन झेडपीत रणकंदन
By Admin | Updated: July 2, 2014 00:20 IST2014-07-01T23:47:25+5:302014-07-02T00:20:51+5:30
लातूर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासनावर आरोपाच्या फैरी झडल्या़

गैरव्यवहाराच्या आरोपावरुन झेडपीत रणकंदन
लातूर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रशासनावर आरोपाच्या फैरी झडल्या़ बांधकाम विभागात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत भाजपा सदस्यांनी गोळा टाकला़ त्यावरुन बरेच घमासान रंगले़ दलित वस्ती विकासातही अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले़ यादरम्यान, पंचायत समित्यांच्या सभापतींचे ‘वॉकआऊट’ अन् अध्यक्षांनी सभागृह सोडल्याने मोठीच पंचाईत झाली़
सभेच्या प्रारंभीच दलित वस्ती विकासकामात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला़ यावर समाजकल्याण अधिकाऱ्यांनी समाधानकारक खुलासा न केल्याने अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी त्यांचा समाचार घेतला़ सदस्यांचे प्रश्न गंभीरपणे घेत नसल्याचे सांगत अशा अधिकाऱ्यांना कामावर ठेवायचे की नाही, यावर निर्णय घेण्याची वेळ आल्याचे अध्यक्ष बनसोडे यांनी सुनावले़
पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचा आरोप झाल्यानंतर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी त्याचे स्पष्टीकरण दिले़ परंतु, पाठांतर अशी हेटाळणी करीत सदस्यांनी या योजनेतही गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त केली़ पशुसंवर्धन सभापती चंद्रकांत मद्दे यांनी १२ टप्प्यातील ही योजना २-३ टप्प्यानंतर अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे राबविली नसल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त करुन चौकशीसाठी समिती नेमू, असा शब्द सभागृहाला दिला़ त्यानुसार अध्यक्षांनी त्रिसदस्यीय समिती जाहीर करुन १५ दिवसांत अहवाल देण्याचा निर्णय दिला़
एसआरएफच्या निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा गटनेते रामचंद्र तिरुके व सदस्यांनी करताच अध्यक्ष बनसोडे चांगलेच भडकले़ या विषयावर मागील सभेत बरीच चर्चा झाल्याचे सांगून आता त्यासाठी वेळ देता येणार नसल्याचे खडसावून सांगितले़ त्यावर ही लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचा आरोप करीत भाजपा सदस्य अध्यक्षांच्या पुढ्यात येऊन खाली बसले़ सदस्यांच्या आग्रहाखातर शेवटी या सदस्यांना अर्धा तास वेळ देण्यात येईल, असे अध्यक्षांनी सांगितले़ तरीही भाजपा सदस्य उठत नव्हते़ गटनेते, सदस्यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते उठत नसल्याने उपाध्यक्ष अशोकराव निलंगेकरांनी मध्यस्थी करीत त्यांना १० मिनिटे देण्यात यावीत, अशी विनंती केली़ या वेळेत तिरुके यांनी सभागृहासमोर कागदपत्र सादर करीत बांधकाम विभागाने १०८ कामेच झाल्याचे सांगितले़ तर दुसरीकडे वित्त विभागाने १६० कामांची बिले देण्यात आल्याचे कळविले आहे़ या दोन्ही याद्या झळकावीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला़ विशेषत: बाभळगावात ११ रस्ते काम बोगस झाल्याचेही तिरुके म्हणाले़ त्यावर उपाध्यक्ष अशोकराव पाटील व सभापती कल्याण पाटील यांनी येत्या काही दिवसांत याबाबतची चौकशी करुन येणाऱ्या सर्वसाधारण सभेत सविस्तर माहिती देऊ, असे सांगितले़ (प्रतिनिधी)
सभापतींचा अधिकाऱ्यांवर निशाणा...
पशुसंवर्धन व बांधकाम विभागाचे प्रश्न सभागृहात उपस्थित झाल्यानंतर या विभागाच्या सभापतींनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला़ कामधेनू योजनेसंदर्भात सभापती मद्दे यांनी अधिकाऱ्यांनीच ही योजना व्यवस्थितपणे राबविली नसल्याचा आरोप केला़ तर बांधकाम सभापती पाटील यांनी तत्कालीन कार्यकारी अभियंता चौधरी व अतिरिक्त सीईओ राठोड यांनी विषय समितीस विश्वासात न घेता परस्पर कार्यारंभ आदेश दिल्याचा आरोप केला़
अन् अध्यक्षांनी सभागृह सोडले़़़
एसआरएफच्या निधीवरुन अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे व भाजपा गटनेते रामचंद्र तिरुके यांच्यात खडाजंगी झाली़ गुरुजी पहिल्यांदाच मोठ्या त्वेषाने बोलताना दिसले़ सभागृहात दबाव आणून आपल्या अधिकाराचे उल्लंघन करणे चुकीचे असल्याचे सांगत भाजपा सदस्यांना कोठे बसायचे तेथे गुमान बसू द्या, असे बनसोडे म्हणाले़ त्यानंतर उपाध्यक्षांनी भाजपा सदस्यांना वेळ देण्याची विनंती केल्यानंतर काहिशा नाराजीतच अध्यक्षपदाची सूत्रे निलंगेकरांकडे सुपुर्द करुन बनसोडे यांनी सभागृह सोडले़
पाणीटंचाईच्या मुकाबल्यासाठी कक्ष
सभागृहातील घमासानानंतर काही महत्वाच्या विषयांवर गंभीरतेने चर्चाही करण्यात आली़ दुष्काळाची जिल्ह्यावर गडद छाया असल्याने पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवत आहे़ या पार्श्वभूमीवर स्वतंत्र टंचाई कक्ष स्थापन करुन काहजी घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ दलित वस्ती विकास योजनेच्या तृतीय आराखड्यासाठी सदस्यांनी आवश्यक ठिकाणच्या शिफारशी करण्याचे ठरले़ तुकडी अनियमितता प्रकरणातील जिल्हा परिषदेत आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचे वेतन सुरु करण्यासंदर्भात शासनाने विचार करावा, असा ठरावही घेण्यात आला़ यासह इतर २२ महत्वाच्या विषयांना या सभेत मंजुरी मिळाली़
पं़स़ सभापतींचे वॉकआऊट़़़
पंचायत समितीच्या सभापतींना या सभागृहात कोणीही विश्वासात घेत नसल्याचा आरोप करुन त्यांनी वॉकआऊट केले़ त्यात लातूरच्या सभापती मंगलप्रभा घाडगे, रेणापूरच्या अनिता पवार, देवणीच्या अरुणा भोसले, औशाच्या ठमूबाई आडे, शिरुर अनंतपाळचे धोंडिराम सांगवे, चाकूरचे चंद्रकांत मारापल्ले, जळकोटच्या सोदरबाई सूर्यवंशी यांचा समावेश होता़