युसूफवडगाव पोलिसांची दोन तरुणांना मारहाण
By Admin | Updated: May 31, 2016 00:03 IST2016-05-30T23:56:49+5:302016-05-31T00:03:27+5:30
युसूफवडगाव : केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे अपघातानंतर कारचालक व अन्य एकास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी पुढे आली.

युसूफवडगाव पोलिसांची दोन तरुणांना मारहाण
युसूफवडगाव : केज तालुक्यातील युसूफवडगाव येथे अपघातानंतर कारचालक व अन्य एकास पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी पुढे आली. याप्रकरणी पोलिसांनी मात्र सावरासावर करीत असे काही घडलेच नाही, असा पवित्रा घेतला आहे.
रविवारी सायंकाळी केज-अंबाजोगाई रस्त्यावरील बोरीसावरगावजळील तुकाराम महाराज पावनधाम मंदिरासमोर कार व दुचाकीत अपघात झाला होता. यात दुचाकी (एमएच ४४ जे ३६४१) वरील विश्वप्रताप पद्माकर वारकरी, सुनील दत्ता कोल्हे (दोघे रा. बोरीसावरगाव) हे दोघे जखमी झाले होते. घटनेनंतर युसूफवडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारचालक सचिन करपे व कारमधील किशोर करपे यांना ताब्यात घेतले. दोघांनाही घटनास्थळीच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ठाण्यात नेऊनही मारहाण करण्यात आली. त्यांचा लेखी जवाब नोंदवून कार जप्त केली.
दरम्यान, अपघातानंतर सचिन व किशोर हे दोघेही घाबरलेले होते. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत ठीक; परंतु मारहाण कशासाठी ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे अद्याप गुन्हाही नोंद नाही. असे असतानाही कार जप्त कशी केली ? हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता, कोणीच काही बोलण्यास तयार नाही. सर्वांनी कानावर हात ठेवले. (वार्ताहर)