युवकांनी तंत्रज्ञानाचा विधायक वापर करावा
By Admin | Updated: July 25, 2016 00:39 IST2016-07-25T00:28:01+5:302016-07-25T00:39:09+5:30
लातूर : तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटमुळे मोठी क्रांती झाली. मात्र, इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत, त्याहीपेक्षा अधिक दुष्परिणाम असल्याचे अलिकडील काळात पुढे आले आहे.

युवकांनी तंत्रज्ञानाचा विधायक वापर करावा
लातूर : तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटमुळे मोठी क्रांती झाली. मात्र, इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत, त्याहीपेक्षा अधिक दुष्परिणाम असल्याचे अलिकडील काळात पुढे आले आहे. युवकांनी प्रवाहाबरोबर वाहत न जाता प्रत्येक बाबींची शहानिशा करुनच तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने विधायक कामासाठी करावा, असा सल्ला राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी लातुरात रविवारी युवकांना दिला.
येथील दयानंद सभागृहात आयोजित रोटरी क्लब लातूर सेंट्रल पदग्रहण समारंभात त्यांनी ‘दहशतवाद व युवकांची जबाबदारी’ या विषयावर संवाद साधला. मंचावर पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, रवींद्र साळुंके, बसवराज उटगे, विनय जाजू, सुखानंद शेटकार, श्रीरंग महाराज औसेकर, मेघराज बरबडे, पुरुषोत्तम सोनी, संजय सोनी यांची उपस्थिती होती.
‘दहशतवाद आणि युवकांची जबाबदारी’ या विषयावर युवकांशी संवाद साधताना कुलकर्णी म्हणाले, आजचा युवक हा ज्ञानाने, माहितीने प्रगल्भ आहे. संगणक, मोबाईल स्क्रिनवर टच केल्यानंतर माहितीची अनेक दालने उघडली जातात. एवढे सर्व काही असले तरी आजच्या युवकांमध्ये ध्येयवादाचा अभाव आहे. सध्याच्या पिढीसमोर चांगले आदर्श निर्माण करता आले नाही, यासाठी मागच्या पिढीला जबाबदार धरावे लागेल. आपले संपूर्ण जीवनच इथल्या राजकारणाने व्यापले आहे. आपण त्यांच्यातच आपला आदर्श शोधायला लागलो आहोत, म्हणून ध्येय ठरवताना युवकांची गफलत होत आहे. प्रास्ताविक मेघराज बरबडे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सोनी यांनी तर आभार संजय बोरा यांनी मानले. (प्रतिनिधी)