युवा नेत्यांचे ‘सरप्राईज लाँचिंग’!

By Admin | Updated: October 9, 2014 00:39 IST2014-10-09T00:01:10+5:302014-10-09T00:39:31+5:30

संजय तिपाले , बीड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घराण्यात वावरणाऱ्या;परंतु राजकारणापासून दूर असलेल्या दोन युवा नेत्यांचे ‘सरप्राईज लॉंचिंग’ झाले आहे़

Youth leaders 'Surprise Launching'! | युवा नेत्यांचे ‘सरप्राईज लाँचिंग’!

युवा नेत्यांचे ‘सरप्राईज लाँचिंग’!



संजय तिपाले , बीड
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घराण्यात वावरणाऱ्या;परंतु राजकारणापासून दूर असलेल्या दोन युवा नेत्यांचे ‘सरप्राईज लॉंचिंग’ झाले आहे़ स्व़ गोपीनाथराव मुंडे यांच्या द्वितीय कन्या डॉ़ प्रीतम मुंडे व स्व़ विमल मुंदडा यांच्या स्रूषा नमिता मुंदडा या दोघी पहिल्यांदाच राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत़ राजकीय ‘इनिंग’ ची धडाक्यात सुरुवात करण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले आहे़ उल्लेखनीय बाब म्हणजे आणखी काही तरुणतूर्क नेतेही स्वत:ला सिद्ध करु पाहत आहेत़
जिल्ह्यात यापूर्वी पारंपरिक लढती होत़ यावेळी युती, आघाडीतील फाटाफुटीने पहिल्यांदाच अनेक तरुण चेहरे आमदार होण्यासाठी मैदानात आले आहेत़ नव्या भिडूंची निवडणूक रणांगणातील ‘एंट्री’ तर धडाक्यात झाली;परंतु राजकीय खाचखळग्याचा अंदाज असणाऱ्या मातब्बरांपुढे त्या सर्वांची कसोटी लागत आहे़ मातब्बरांच्या ‘बाऊन्सर’, ‘गुगली’ला हे युवा नेते कसे उत्तर देतात? हे निकालानंतरच कळेल़
मनसे, शिवसेना, काँग्रेसने
दिले तरुण उमेदवार
गेवराईत मनसेने राजेंद्र मोटे या तरुण पदाधिकाऱ्याला मैदानात उतरविले आहे़ पंडितांची हुकूमत व राजकारणाचा वारसा असलेल्या अ‍ॅड़ लक्ष्मण पवारांशी ते झुंज देत आहेत़ याच मतदारसंघात शिवसेनेने अजय दाभाडे या नवख्या पहेलवानाला तिकिट दिले़ पंडित व पवार यांच्याशी ते टक्कर देत आहेत़ केजमध्ये भाजपाने उमेदवारी डावलल्याने काँग्रेसची उमेदवारी मिळवून डॉ़ अंजली घाडगे यांनी भाजपासह राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण केले आहे़ याच मतदारसंघात मनसेने यशवंत उजगरे या तरण्याबांड शिलेदारावर विश्वास दाखवला तर आष्टीत मनसेने वैभव काकडे ही नवी कोरी पाटी पुढे केली आहे़ या सर्वांची मातब्बरांशी लढाई आहे़
स्व़ गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे गतवेळच्या विधानसभा निवडणुकीत राजकारणात सक्रिय झाल्या तर स्व़ विमल मुंदडा यांचे चिरंजीव अक्षय मुंदडा हे देखील गत विधानसभा निवडणुकीत राजकारणात आले़
४मुंडेंच्या द्वितीय कन्या डॉ़ प्रीतम मुंडे या सक्रिय राजकारणापासून कायम दूर राहिल्या़ मात्र, मुुंडेंनंतर त्यांना थेट लोकसभा निवडणूूक लढवावी लागत आहे़
४दुसरीकडे स्व़ विमल मुंदडा यांच्या स्नूषा नमिता मुंदडा यांचाही राजकारणाशी थेट संबंध कधी आलेला नाही़ केज विधानसभा पोटनिवडणुकीत त्या राष्ट्रवादीकडून लढत आहेत़
४त्या दोघींच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली आहे़
मात्तबर घराण्यातील युवा ब्रिगेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत चांगलीच सक्रिय झाली आहे़ राजकारणापासून अलिप्त राहिलेले हे नवे चेहरे सध्या वडील, बहीण, काका यांच्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत़ आष्टीमतदारसंघातील राकाँचे उमेदवार सुरेश धस यांच्यासाठी त्यांचे चिरंजीव जयदत्त धस, भाजपाचे भीमराव धोंडे यांचे पुत्र अजय धोंडे यांनी प्रचाराची राळ उडविली आहे़
४पंकजा मुंडे व डॉ़ प्रीतम मुंंडे यांच्या मदतीला छोटी बहीण अ‍ॅड़ यशश्री मुंडे धावून गेली आहे़ त्या प्रचारासाठी गावोगाव फिरत आहेत़ काँग्रेसचे उमेदवार प्रा़ टी़पी़ मुंडे यांच्यासाठी पुत्र प्रा.विजय, प्रदीप मुंडे व कन्या जयश्री गिते सरसावले आहेत़ बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी पुतणे डॉ़ योगेश क्षीरसागर पहिल्यांदाच प्रचारात सक्रिय झाले आहेत तर चिरंजीव रोहीत क्षीरसागर हे वडिलांसाठीपरदेशातून बीडला परतले आहेत़ त्यांनीही प्रचारात उडी घेतली आहे़

Web Title: Youth leaders 'Surprise Launching'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.