पत्नी दांडियाला जाताच तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: October 10, 2016 01:13 IST2016-10-10T00:56:31+5:302016-10-10T01:13:13+5:30
औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त परिसरातील दांडिया पाहण्यासाठी पत्नी घराबाहेर पडली. त्यानंतर घरी एकटा असलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नी दांडियाला जाताच तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त परिसरातील दांडिया पाहण्यासाठी पत्नी घराबाहेर पडली. त्यानंतर घरी एकटा असलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री बेगमपुरा परिसरातील कुतुबपुरा येथे रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
राहुल अशोकराव मोरे (२१, रा. कुतुबपुरा, लालमंडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, राहुल हा पेंटर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असे. त्यास दारूचे व्यसन होते. सात ते आठ महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला. शनिवारी रात्री त्याने नातेवाईकांसह भोजन केले. त्यानंतर त्याची पत्नी अन्य नातेवाईकांसह दांडिया पाहण्यासाठी गेली. यावेळी तो घरी एकटाच असताना त्याने पत्र्याच्या खोलीत छताला असलेल्या लाकडी बल्लीला ओढणी बांधून गळफास घेतला.
काही वेळानंतर त्याची पत्नी आणि अन्य नातेवाईक घरी आले, तेव्हा त्यांना हा प्रकार दिसला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राहुल यास घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.