वडील दारू पिऊन आईशी भांडायचे म्हणून तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: December 28, 2015 00:27 IST2015-12-27T23:51:46+5:302015-12-28T00:27:57+5:30
औरंगाबाद : वडील दारू पिऊन आईशी भांडायचे. याचा खूप त्रास व्हायचा म्हणून एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

वडील दारू पिऊन आईशी भांडायचे म्हणून तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : वडील दारू पिऊन आईशी भांडायचे. याचा खूप त्रास व्हायचा म्हणून एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुंडलिकनगरातील गल्ली क्रमांक आठमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली.
योगेश संतोष घुले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, योगेशचे मूळ गाव नेवासा तालुक्यात आहे. त्याचे आई-वडील कामानिमित्त औरंगाबादेत स्थायिक झालेले आहेत. वडिलांसोबत योगेशही मजुरी करायचा. त्याने शिक्षण अर्धवट सोडलेले आहे. रविवारी दुपारी योगेशची आई कंपनीत कामावर गेली. तर, वडीलही मजुरीसाठी गेले असताना योगेशने राहत्या घरात गळफास घेतला. घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलीस चौकीला मिळाल्यावर फौजदार अरुण घोलप, पोलीस नाईक कारभारी गाडेकर यांनी मृतदेह घाटीत दाखल केला. आत्महत्येपूर्वी योगेशने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात वडील दारू पिऊन आईशी सतत भांडत असत. त्यांच्या नेहमीच्या वादाचा मला खूप त्रास व्हायचा म्हणून मी आत्महत्या करीत आहे, असे नमूद केले आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फौजदाराचा हलगर्जीपणा...
पुंडलिकनगर भागात तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस चौकीला मिळाल्यावर घटनास्थळी जाण्यासाठी ठाणे अंमलदार सोनवणे यांनी सहायक फौजदार मोकळे यांना फोन केला. मोकळे यांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. त्यावर ही माहिती पोलीस निरीक्षक आसाराम जाहरवाल यांना देण्यात आली. त्यांनी मोकळे यांना पुन्हा फोन करण्यास सांगितले. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाईल स्वीचआॅफ असल्याचे सांगण्यात येत होते. मोकळे यांच्या हलगर्जीपणाबाबत ठाण्याच्या डायरीत नोंद करण्यात आली आहे.