छत्रपती संभाजीनगर : रवींद्रनगरमधील अवैध दारूच्या गुत्त्यावर गेलेल्या मित्राला दोघांनी मारहाण करून १६ एप्रिलला खून केला. फिट्स आल्याचे खोटे सांगून घाटीत अनोळखी म्हणून भरती केले. संशय आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करून जिन्सी पोलिसांनी तपास सुरू केला. सोमवारी शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या शरीरावर १७ जखमा, डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. शेख समी शेख समशू (२९, रा. शताब्दीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, नाजिम शहा मोहम्मद शहा (४२, रा. कटकट गेट) आणि शेख अरबाज शेख युसूफ (२४, रा. शहाबाजार) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली.
जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक प्रताप साळवे यांच्या तक्रारीनुसार, समीच्या अकस्मात मृत्यूचा तपास करताना आढळून आले की, नितीन दाभाडे आणि शेख अरबाज हे मृत समीच्या ओळखीचे आहेत. दाभाडे हा रवींद्रनगरात अवैध दारूचा गुत्ता चालवितो. तिथे आरोपी मोहम्मद शाह दारूविक्रीचे काम करतो. शेख अरबाज हा दाभाडेचा मेहुणा आहे. आरोपी अरबाज, नाजीम आणि मृत समी तिघे मित्र असून दारू पिण्याच्या सवयीचे आहेत. समी दाभाडेच्या दारूच्या गुत्त्यावर गेला होता. तिथे नाजीम, अरबाज यांचा समीसोबत वाद होऊन हत्याराने मारहाण केली. त्यात समीचा मृत्यू झाला. त्यानंतर दाभाडेला बोलावून घेतले. अरबाज आणि दाभाडेने समीला घाटीत नेले. मात्र, तिथे अनोळखी व्यक्ती असल्याचे सांगून फिट्स आल्याचे सांगितले. सोमवारी डॉक्टरांनी अहवाल दिला. त्यावरून घटनेचा उलगडा झाला.