खंडाळ्यात गुटखा विक्री करणाऱ्या तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:32 IST2020-12-17T04:32:46+5:302020-12-17T04:32:46+5:30
खंडाळा : वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरात बंदी असलेल्या गुटख्याची अवैधपणे विक्री होत असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी व वैजापूर ...

खंडाळ्यात गुटखा विक्री करणाऱ्या तरुणास अटक
खंडाळा : वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरात बंदी असलेल्या गुटख्याची अवैधपणे विक्री होत असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी व वैजापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून खंडाळा शिवारात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त यंत्रणेकडून खंडाळा परिसरात गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जरूर फाटा येथे पोलिसांनी सापळा रचला. तेव्हा या मार्गावरून निळ्या रंगाची दुचाकी घेऊन जाणाऱ्या मोटारसायकलच्या शीटवर गोण्या बांधलेल्या दिसल्या. त्या दुचाकीचालकाला थांबवून झडती घेण्यात आली. त्याचे नाव विचारले असता रेहान बुऱ्हाण खान (१९, रा. खंडाळा) असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या गोण्यांची तपासणी करून त्याच्याकडून पानमसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू आदी ४२ हजार २०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. रेहान याने पोलिसांना सांगितले की, हा माल मी विक्रीच्या उद्देशाने आणला आहे, तो इम्रान सय्यद (रा. नांदगाव रोड, येवला) यांच्याकडून आणला आहे. अखेर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधवर यांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात रेहान बुऱ्हाण खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तर तीस हजार किमतीची टीव्हीएस स्टार दुचाकी व गुटखा मिळून ७० हजारांचा माल जप्त केला. या कारवाईत पोलीस नाईक पवार, पोलीस नाईक बेग यांचा समावेश होता.