अश्लील छायाचित्र नातेवाइकांना पाठवून बदनामी करणाऱ्या तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:02 IST2021-04-09T04:02:06+5:302021-04-09T04:02:06+5:30
औरंगाबाद : ती आणि तिच्या नातेवाइकांनी लग्नाला नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिचे बनावट अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर आणि तिच्या नातेवाइकांना ...

अश्लील छायाचित्र नातेवाइकांना पाठवून बदनामी करणाऱ्या तरुणाला अटक
औरंगाबाद : ती आणि तिच्या नातेवाइकांनी लग्नाला नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने तिचे बनावट अश्लील छायाचित्र समाजमाध्यमावर आणि तिच्या नातेवाइकांना पाठवून बदनामी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बालमैत्रीण असलेली तरुणी आणि आरोपी अजय यांनी एकत्र छायाचित्रे काढली होती. तो तिच्यावर प्रेम करीत होता. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, तो कामधंदा करीत नसल्यामुळे आई-वडील लग्नाला होकार देणार नाही, असे तिने त्याला सांगितले. शिवाय आई-वडील सांगतील त्याच मुलासोबत लग्न करणार असल्याचे तिने त्याला सांगितले. याचा त्याला राग आला. यातूनच त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने इंटरनेटवरून दुसरा मोबाईल क्रमांक मिळवून तिचे आणि त्याचे छायाचित्र तिच्या मोबाईलवर पाठवून हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. तिने त्याला दाद न दिल्यामुळे त्याने तिच्या जवळच्या नातेवाइकांना आक्षेपार्ह छायाचित्रे पाठविली. ही बाब तक्रारदार तरुणीला समजली. छायाचित्रे पाठविणारा ओळख लपवून हे काम करीत होता. मात्र, आपली छायाचित्रे केवळ गावातील त्या मित्राजवळच आहेत. त्यामुळे तिने थेट सायबर पोलीस ठाणे गाठून थेट त्याची तक्रार केली. पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कैलास कामटे, संदीप वरपे, रवींद्र लोखंडे, नितीन जाधव यांनी कारवाई करीत आरोपी अजय कडुबा कांबळे याला अटक केली. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असता त्यात तक्रारदार तरुणीला ज्या मोबाईल क्रमांकवरून छायाचित्रे पाठविली तो क्रमांक आणि छायाचित्रे आढळून आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.