छत्रपती संभाजीनगर : भावासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तीन महिलांनी एका तरुणीला उद्यानातच बेदम मारहाण केली. आसपास लहान मुले खेळत असताना शिवीगाळ, आरडाओरड करून हा धिंगाणा सुरू होता. एन-११ मधील सार्वजनिक उद्यानात दुपारी ही घटना घडली.
अंदाजे २५ वर्षांची तरुणी रविवारी एन-११ च्या सुदर्शननगरमधील एका उद्यानात बसलेली होती. तीन महिलांनी तिचा पाठलाग करत, तिला उद्यानात गाठले. अचानक तिच्यावर हल्ला चढवून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तरुणी मारहाण न करण्यासाठी विनवण्या करत होती. मात्र, तीनही संतप्त महिलांनी तिला जमिनीवर पाडून मारहाण केली. माझ्या भावाचा नाद सोड, अशी धमकी देत शिवीगाळ केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये तरुणाची आई, काकू असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला, शिवाय मुलीपायी मुलाने आईलाच सुनावल्याने हा वाद टोकाला गेला. त्यातून तीन महिलांनी मिळून मुलीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान, सिडको पोलिस ठाण्यात सोमवारी सायंकाळपर्यंत या घटनेप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.