छत्रपती संभाजीनगर : तीन वर्षांपासून मुलांची शाळेत ने-आण करणाऱ्या व्हॅन चालकाने नऊ वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केले. दोघे बाहेर फिरायला जाऊ, तू आईवडिलांना घरी येण्यास उशीर होणार असल्याचे सांग, असे म्हणत हात पकडला. विशेष म्हणजे, पोलिस आयुक्तालयाने दडपण्याचा प्रयत्न केलेली ही संतापजनक घटना पोलिसांची विद्यार्थी सुरक्षा मोहीम सुरू असताना ३१ जुलै रोजी घडली. गणेश संपत शिंदे (३४, रा.आंबेडकरनगर) असे आरोपी चालकाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली.
नऊ वर्षांची मुलगी हर्सूल टी पॉइंट येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. शाळेत तीन वर्षांपासून गणेशच्याच व्हॅनने ती जाते. ३० जुलै रोजी मात्र दुपारी २ वाजता घरी व्हॅनमधील सर्व मुले उतरल्यानंतर घरापासून काही अंतरावर व्हॅन थांबवत गणेशने तिचा हात पकडला. ‘तू खूप क्युट आहेस, उद्या आपण दोघे फिरायला बाहेर जाऊ, तू घरी तुझ्या आईवडिलांना सांग शाळेतून येण्यास उशीर होणार आहे,’ असे म्हणाला. या घटनेमुळे मुलगी प्रचंड घाबरून गेली. सावरून ती सीटवरच मागे सरकली. त्यानंतर, गणेशने तिला घरी सोडत हा प्रकार कोणाला सांगू नको, असेही बजावले.
दिवसभर शांत, विश्वासात घेतल्यावर रडतच सांगितलेघरी गेलेली मुलगी दिवसभर शांत होती. त्यामुळे आईवडिलांना संशय आला. रात्री १० वाजता आईने तिला विश्वासात घेतल्यावर तिने गणेशच्या कृत्याविषयी सांगितले. संतप्त आईवडिलांनी तातडीने शाळेला संपर्क साधला. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर, गणेशवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
कंत्राटदार एक, चालविणारा दुसराचकुटुंबाने शाळेला संपर्क केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडे चालकाचा क्रमांकच नव्हता. व्यवस्थापनाने कंत्राटदाराचा क्रमांक असल्याचे सांगितले. त्याने विद्यार्थ्यांच्या व्हॅनचा कंत्राट घेतला असून, विविध चालकांना काम दिल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली.