सीताफळ लागवडीतून घेतले चार लाखांचे उत्पन्न
By Admin | Updated: December 18, 2015 23:31 IST2015-12-18T23:24:44+5:302015-12-18T23:31:27+5:30
मोहन बोराडे, सेलू सेलू तालुक्यातील हातनूर येथील तरुण शेतकरी तुषार संजय काकडे याने तीन एकर सीताफळाच्या लागवडीतून यंदा चार लाख तेरा हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले.

सीताफळ लागवडीतून घेतले चार लाखांचे उत्पन्न
मोहन बोराडे, सेलू
उच्च शिक्षण सुरु असतानाच शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सेलू तालुक्यातील हातनूर येथील तरुण शेतकरी तुषार संजय काकडे याने तीन एकर सीताफळाच्या लागवडीतून यंदा चार लाख तेरा हजार रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले.
हातनूर येथील शेतकरी तुषार संजय काकडे याने बी. एस्सी. तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच सीताफळाची लागवड शेतात केली. तीन एकर शेतामध्ये ही लागवड शेतकरी तुषार काकडे याने केली. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन व तज्ज्ञांचा सल्ला घेत सीताफळांचा स्वत:चा मुक्ताई गार्डन हा ब्रॅन्ड या शेतकऱ्याने राज्यात प्रसिद्ध केला आहे. तीन एकर शेतात १० बाय १० या अंतरावर जवळपास ८०० सीताफळांच्या झाडांची लागवड त्यांनी केली आहे. दुष्काळी स्थिती असल्यामुळे यातील निम्मी झाडे पाण्याअभावी जळाली. परंतु, जिवंत झाडांना ठिबकद्वारे पाणी देऊन सीताफळ जगविण्याचे काम त्यांनी केले. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन खत, फवारणी करीत झाडांची जोपासणी केली.
यंदाच्या हंगामात ४६५ सीताफळांच्या झाडातून तब्बल ७२३ कॅरेट सीताफळांचे उत्पन्न मिळाले आहे. जवळपास १ किलोच्या आसपास एका सीताफळाचे वजन भरले आहे. ही सीताफळे मुक्ताई गार्डनची असा स्वत:चा ब्रॅण्ड वापरत ४, ६, १२, ३६ नग प्रमाणे पॅकिंग करुन हा माल अकोला येथील बाजारापेठेत त्यांनी विकला. या मालाला चार लाख १३ हजारांचे विक्रमी उत्पन्न त्यांना मिळाले आहे. सीताफळ लागवडीसाठी केवळ ६५ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.
वडिलांनी शेतात लक्ष घालून आधुनिक शेती करण्यासाठी मला प्रोत्साहित केले. अकोला येथे झालेल्या सीताफळ परिषदेच्या निमित्ताने प्रदर्शनात मुक्ताई गार्डन सीताफळाला अनेकांनी मागणी केली. त्यामुळे अजून मेहनत करुन दोन एकर शेतामध्ये सीताफळाचीच लागवड करणार आहे.
-तुषार काकडे
सीताफळाचा दर्जा व चवीला मधुर असल्यामुळे अकोला बाजारपेठेत मुक्ताई गार्डनच्या मालाला मागणी वाढू लागली. मोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी ओमप्रकाश चव्हाळ यांच्या मार्गदर्शनातून तरुण शेतकरी तुषार काकडे याने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन अकोला बाजारपेठेत स्वत:चा ब्रॅण्ड विकसित केला. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून तुषार काकडे या शेतकऱ्याने शेळीपालन केले आहे. दुधनाच्या कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर करुन विक्रमी उत्पन्न त्यांनी मिळविले आहे. यामुळे सेलू तालुक्यात शेतकरी तुषार काकडे यांच्या सीताफळ लागवडीची सर्वत्र चर्चा आहे.