...तरीही जिल्ह्यात ८ अर्भकांचा मृत्यू
By Admin | Updated: January 15, 2016 23:33 IST2016-01-15T23:32:40+5:302016-01-15T23:33:59+5:30
हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानासह विविध योजनांत माता व बालमृत्यू रोखण्याचे जोरदार प्रयत्न होत असतानाही ८ अर्भकांचा तर ३ मातांचा मृत्यू

...तरीही जिल्ह्यात ८ अर्भकांचा मृत्यू
हिंगोली : जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असताना, राष्ट्रीय आरोग्य अभियानासह विविध योजनांत माता व बालमृत्यू रोखण्याचे जोरदार प्रयत्न होत असतानाही ८ अर्भकांचा तर ३ मातांचा मृत्यू झाल्याचे मानव विकास मिशनच्या अहवालावरून दिसून येत आहे.
मानव विकास मिशनचे काम जिल्ह्यातील तीनच तालुक्यांत चालते. त्यामुळे या तीन तालुक्यांतीलच ही आकडेवारी आहे. इतर तालुक्यांतील चित्र समोर आल्यास या आकडेवारीत आणखी वाढ होणार आहे. जवळपास २४ प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याच्या दुप्पट उपकेंद्र असे मोठे जाळे आहे. उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयेही आहेत. याशिवाय १0२ गाड्यांचे जाळे आहे. तरीही अनेकदा ही यंत्रणा दक्ष नसल्याचे प्रकार समोर येतात. वसमतच्या महिला रुग्णालयाचाच विचार केला तर कायम वादात राहणारे हे रुग्णालय महिलांची हेळसांड करण्याचे जणू केंद्रच असल्याचा भास होतो. अशा एकंदर चित्रामुळे माता व बाल आरोग्याचीही स्थिती चिंताजनक दिसते. हिंगोली-३, सेनगाव-३ व आंैढा ना.-२ असे अर्भक मृत्यू झाले. तर हिंगोलीत२ व सेनगावात एक माता मृत्यू झाला. कमी वजनाच्या बालकांची संख्या २ आढळली आहे.
मानव विकास मिशन अंतर्गत तज्ज्ञ महिला डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. काही दिवसांपूर्वी ही शिबिरे रेंगाळल्याने ओरड सुरू होती. आता ती घेतली जात आहेत. यासाठी मानव विकास मिशनमध्ये २५.९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांत हे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यात एकूण १९२ शिबिरे घ्यावयाची असताना डिसेंबरअखेर फक्त ८ घेण्यात आल्याने बोंब सुरू आहे.