येडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवाची सांगता
By Admin | Updated: April 16, 2017 23:20 IST2017-04-16T23:15:54+5:302017-04-16T23:20:40+5:30
येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवानिमित्त आमराई मंदिरामध्ये पाच दिवसाच्या मुक्कामासाठी आलेली देवीची पालखी रविवारी वाजत-गाजत डोंगरावरील मुख्य मंदिरात दाखल झाली

येडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवाची सांगता
येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवानिमित्त आमराई मंदिरामध्ये पाच दिवसाच्या मुक्कामासाठी आलेली देवीची पालखी रविवारी वाजत-गाजत डोंगरावरील मुख्य मंदिरात दाखल झाली. यानंतर या यात्राउत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येरमाळासह परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेला ११ एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीची आमराई मंदिरामध्ये पाच दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल झाली होती. रविवारी दुपारी या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी मंदिरामध्ये विधीवत पूजा-अर्चा क़रून घुगरी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. चुन्याच्या रानात पालखीचे आगमन झाल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. येथून पुढे पालखी सोहळा गावातील मुख्य रस्त्यावरून मंदिराकडे निघाला. यादरम्यान महिलांनी पालखी मार्गावर स्वागतासाठी सडा टाकून रांगोळी काढल्या होत्या. चौका-चौकात पालखीचे दर्शन घेऊन लोक पालखीच्या खांदेकऱ्यांच्या पायावर घागरीने पाणी ओतून लाह्या, बत्तासे व फुटाण्याचा प्रसाद एकमेंकांना वाटत होते. या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये कुस्ती स्पर्धा, पशुप्रदर्शन, आराध्यांच्या गाण्याचा मेळा, शोभेच्या दारूची आतषबाजी आदी कार्यक्रम पार पडले. पालखीला निरोप देण्यासाठी मानकरी आमोल पाटील, रामराव पाटील, अंकुश पाटील, सुभाष पाटील, सुनील पाटील, यशवंत पाटील, सरपंच विकास बारकूल, मदन बारकूल, संजय बारकूल, संजय निचळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)