यंदा शिक्षकांना बदल्यांची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 23:44 IST2016-04-26T23:41:33+5:302016-04-26T23:44:56+5:30
हिंगोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २0१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे

यंदा शिक्षकांना बदल्यांची आस
हिंगोली : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २0१४ च्या शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र यंदाही शिक्षकांच्या बदल्या होणार की नाही, याबाबतच्या संदिग्धतेतच शिक्षण विभाग दिसत आहे.
गतवर्षी संचमान्यता व शासन निर्णयाचा अन्वयार्थ काढल्याने शिक्षकांच्या बदल्यांची अडचण होऊन बसली होती. जि.प.च्या इतर विभागांच्या बदल्या झाल्या तरीही शिक्षण विभागाच्या मात्र बदल्या झाल्या नव्हत्या. यंदाही शिक्षण विभागाने पूर्ण शासन निर्णय न पाहताच बदल्यांसाठी सामान्य प्रशासनकडून मार्गदर्शन मागविण्याची तयारी चालविली होती. शासनाने बदल्यांबाबत पत्र पाठविल्याचे कळताच शिक्षकांत त्याबाबत चर्चा होत आहे. त्यामुळे यंदा या प्रक्रियेबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्कंठा दिसत आहे. त्यासाठी बदल्यांसाठी इच्छुकांच्या जि.प.कडे फेऱ्या सुरू झाल्या आहेत. परंतु जि.प.त मात्र वेगळेच चित्र सुरू असल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. शिक्षण विभागाने तर टिपणी लिहून मार्गदर्शन मागविण्याची तयारीही केली होती. मात्र याबाबत सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याशी चर्चा केली असता २0१४ च्या शासन निर्णयात जिल्हा स्तरावर १0 टक्के बदल्यांचे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सांगितले. सर्वच प्रकारात जवळपास हाच निकष आहे. तालुकास्तरावर मात्र त्यात बदल आहे. तालुका स्तरावर प्रशासकीय १0 टक्के तर विनंतीवरून ५ टक्के बदल्यांची तरतूद आहे.
यंदा बदल्यांबाबत अजून प्रक्रिया सुरू झाली नाही. त्याची माहिती मागविण्यास सांगण्यात येणार आहे. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आताच बदल्यांबाबत निश्चित काही सांगणे अवघडच दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
पुन्हा अडचण : संचमान्यताच नाही
संचमान्यता व समायोजन नसल्याने गेल्यावर्षी बदल्यांचे आदेश काढण्यात आले नव्हते. यंदाही अजून याबाबत कोणतीच प्रक्रिया झालेली नाही. संचमान्यतेचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून केले जात आहे. परंतु त्याची काहीच काळजी न घेतल्याने काम ठप्पच असल्याचे दिसून येते.