तु. शं. कुलकर्णी यांना जीवनगौरव
By Admin | Updated: August 1, 2016 00:08 IST2016-08-01T00:02:03+5:302016-08-01T00:08:51+5:30
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी परिषदेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ लेखक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली

तु. शं. कुलकर्णी यांना जीवनगौरव
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी परिषदेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ लेखक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण ‘मसाप’च्या वर्धापन दिनी २९ सप्टेंबर रोजी नांदेड येथे होईल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
‘मसाप’च्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बढे, के. एस. अतकरे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, देवीदास कुलकर्णी, डॉ.आसाराम लोमटे, देवीदास फुलारी, प्रा. सुरेश सावंत, रामचंद्र तिरुके, दगडू लोमटे, रसिका देशमुख, संजीवनी तडेगावकर, डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ.रामचंद्र काळुंखे, विलास सिंदगीकर, संतोष तांबे आदी उपस्थित होते. प्रा. तु. शं. कुलकर्णी यांचे ‘तृणाची वेदना’,‘ग्रीष्मरेखा’, ‘अखेरच्या वळणावर’ हे कथा संग्रह प्रसिद्ध असून ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता (१९६०-१९८०)’ या ग्रंथाचे त्यांनी साहित्य अकादमीसाठी संपादन केले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘प्रतिष्ठान’ या नियतकालिकाचे संपादकपद तु. शं. कुलकर्णी यांनी भूषविले आहे. ‘मसाप’च्या कार्यवाहपदाची त्यांनी पंधरा वर्षे जबाबदारी पार पाडली.
नामशेष होणाऱ्या शब्दांचा कोष
‘मसाप’च्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात झालेल्या बैठकीत परिषदेच्या वाङ्मयीन उपक्रमाबाबत चर्चा झाली. मराठवाड्याच्या बोलीभाषेतील नामशेष होत जाणाऱ्या शब्दांचा कोष तयार करण्यासाठी या शब्दांचे संकलन व अभ्यासासाठी एक समिती डॉ.शेषराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
कौतिकराव ठाले यांचा अमृतमहोत्सव सोहळा उदगीरला
मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा २४ आॅगस्ट रोजी उदगीर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. परिषदेच्या रविवारच्या कार्यकारिणीच्या बैठकीत रामचंद्र तिरुके यांनी ठाले यांचा सत्कार केला. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, प्रा. किरण सगर, डॉ. दादा गोरे, डॉ. भास्कर बढे, के. एस. अतकरे, देवीदास कुलकर्णी, डॉ. आसाराम लोमटे, देवीदास फुलारी, प्रा. सुरेश सावंत, दगडू लोमटे, रसिका देशमुख, संजीवनी तडेगावकर, डॉ.ऋषिकेश कांबळे, डॉ.रामचंद्र काळुंखे, विलास सिंदगीकर, संतोष तांबे आदी उपस्थित होते.