यशश्री मुंडेंचीही राजकारणात ‘एन्ट्री’ !
By Admin | Updated: March 30, 2015 00:43 IST2015-03-30T00:23:08+5:302015-03-30T00:43:40+5:30
परळी : तालुक्याच्या राजकारणावर शेवटपर्यंत मजबूत पकड ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सत्तास्थाने अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर येऊन ठेपले होते

यशश्री मुंडेंचीही राजकारणात ‘एन्ट्री’ !
परळी : तालुक्याच्या राजकारणावर शेवटपर्यंत मजबूत पकड ठेवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सत्तास्थाने अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर येऊन ठेपले होते. डॉ. प्रीतम खाडे यांना अनपेक्षितपणे राजकारणात उतरावे लागले. वैद्यनाथ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने स्व. मुंडे यांच्या धाकट्या कन्या अॅड. यशश्री मुंडे यांचीही राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे.
२१ जागांसाठी १२१ उमेदवार रिंगणात आहेत. स्थापनेपासून कारखान्यावर गोपीनाथराव मुंडे यांचा रुबाब होता. मात्र आता कारखान्याची सत्ता खेचून घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कंबर कसली आहे. जेष्ठ संचालक व धनंजय यांचे वडील पंडितराव मुंडे यांनीही जोर लावला आहे. त्यामुळे पंकजाविरूद्ध धनंजय अशी थेट लढत पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. धनंजय मुंडे, पंडितराव मुंडे हे पिता-पुत्र एकीकडून तर पंकजा मुंडे, अॅड. यशश्री मुंडे या भगिनी दुसरीकडून झुंज देत आहेत. अस्तित्व, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा या निमित्ताने कस लागत आहे.
पंकजा यांच्याकडे राजकारणाचा अनुभव आहे. मात्र, अॅड. यशश्री मुंडे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. वकिलीचे शिक्षण घेऊन बॅरिस्टर होण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या यशश्री यांना वडिलांच्या निधनानंतर अचानक राजकारणात यावे लागले आहे. विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीवेळी त्या प्रचारात सक्रिय होत्या.
वैद्यनाथ कारखान्याचा कारभार मागील काही दिवसांपासून यशश्री याच पाहत आहेत. त्यामुळे त्यांचा गृहपाठ झाला आहे. मोठ्या भगिनी पंकजा यांच्यासाठी त्या धावल्या आहेत. राजकारणाच्या डावपेचात विरोधकांना त्या कशा सामोरे जातात? यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. (वार्ताहर)
विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. हे आव्हान पेलवताना त्यांच्या मदतीला अॅड. यशश्री मुंडे धावल्या होत्या.
४मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेटीगाठी घेऊन त्यांनी प्रचार केला होता.
४गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी मोठ्या खुबीने मतदारांपुढे ठेवला होता.
४गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर कारखान्याची धुरा यशश्री यांच्याकडे होती.
४पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.