सीआरपीएफमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली गंडविले
By Admin | Updated: June 2, 2016 23:45 IST2016-06-02T23:34:57+5:302016-06-02T23:45:03+5:30
औरंगाबाद : बेरोजगार तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे अनेक जण सध्या सक्रिय आहेत.

सीआरपीएफमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली गंडविले
औरंगाबाद : बेरोजगार तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे अनेक जण सध्या सक्रिय आहेत. अशाच प्रकारे एका तरुणाला केंद्रीय राखीव सुरक्षा दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी एका पोलिसासह दोन आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
भास्कर चौतमल (रा. जयभवानीनगर) आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव (रा. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, अमोल तबडे (रा. पारध, ता.भोकरदन, जि.जालना) या तरुणाने २०११ मध्ये भास्कर याच्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात दोन महिने प्रशिक्षण पूर्ण केले.
नंतर भास्करने अमोल यास सीआरपीएफमध्ये भरती व्हायचे असेल तर २ लाख ३० हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. अमोलची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी गावातील एका सावकाराकडून २ लाख रुपये व्याजाने घेतले. त्यातील दीड लाख भास्करला दिले. उर्वरित ८० हजार रुपये जालना पोलीस दलात कार्यरत कॉन्स्टेबल संजय जाधव (रा.पारध) याच्याकडे दिले. जाधव याने ही रक्कम चौतमल यास देतो, असे सांगितले होते. २०१२ मध्ये चौतमल हा अमोल यास सीआरपीएफ भरतीसाठी नागपूर येथे घेऊन गेला. यावेळी एका अनोळखी इसमासोबत त्याने भेट घालून दिली. यांच्याकडून तुमचे काम होईल, असे अमोल यास सांगितले. तीन महिने उलटले तरी नोकरीची आॅर्डर आली नाही. त्यामुळे चौकशी केली असता त्यांनी भरती प्रक्रियेस स्थगिती असल्याचे सांगितले.
तसेच जाधव यानेही चौतमलवर विश्वास ठेवा, असे सांगून अमोल यास गप्प बसविले. आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच अमोलने पैशासाठी तगादा लावला, तेव्हा जाधवने ४० हजार तर चौतमलने १० हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम ते परत करीत नसल्याने अमोलने मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक गीते तपास करीत आहेत.