डिजिटल शिक्षणाच्या काळात लेखन-पाटी कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:02 IST2021-08-21T04:02:17+5:302021-08-21T04:02:17+5:30
आळंद : साधारण पंधरा ते वीस वर्षांपूर्वी लेखन - पाटीने शिक्षणाचा श्रीगणेशा होत असे. मात्र, काळाच्या ओघात शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र ...

डिजिटल शिक्षणाच्या काळात लेखन-पाटी कालबाह्य
आळंद : साधारण पंधरा ते वीस वर्षांपूर्वी लेखन - पाटीने शिक्षणाचा श्रीगणेशा होत असे. मात्र, काळाच्या ओघात शिक्षणक्षेत्रात अमुलाग्र बदल झाला असून, डिजिटल, ऑनलाईन शिक्षणामुळे लेखन - पाटी कालबाह्य झाली आहे.
साधारणपणे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मुलांचा प्रवेश घ्यायच्या वेळी शिक्षणासाठी लेखन-पाटी हे अत्यावश्यक होती. बाराखडी, उजळणी व इतर शिक्षणाचे धडे हे त्यावरच गिरवले जात. मात्र, स्पर्धेच्या युगामुळे शिक्षणात नाविन्यपूर्ण बदल झाल्याने पाल्याला शाळेत प्रवेश घेताच पाटी-लेखनीची जागा आता वही, पेन्सिल, पेनने घेतल्याचे चित्र आहे. कोरोना काळात दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्यामुळे वही, पेन्सिल, पेनच्या जोडीला आता ॲन्ड्राईड मोबाईल आला. वर्गनिहाय ग्रुप तयार करून त्यात विद्यार्थी किंवा पालकांचा मोबाईल नंबर जोडून ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना एकसमान ऑनलाईन शिक्षण मिळत आहे. सध्याच्या काळात पाटी-लेखनची जागा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मोबाईलने घेतली आहे. त्यामुळे पाटी - लेखणीच्या काळातील 'स्वस्त शिक्षणा'च्या जागी वही, पेन, पेन्सिल आणि मोबाईल आल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण 'महागडे' झाले. यासह शैक्षणिक वस्तूंच्या खरेदीमुळे पालकांच्या खिशावरील आर्थिक 'भार'ही वाढल्याचे चित्र आहे.
अगदी बालवाडी, पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या पाटी-लेखणीला आता ब्रेक लागला आहे. ग्रामीण व शहरी भागात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र, ग्रामीण भागात नेटवर्कअभावी अनेकदा शिक्षणात व्यत्यय येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. काही शाळा अद्याप बंद असल्याने शाळेत न जाता पुढच्या वर्गात प्रवेश मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांची अक्षर ओळख मिटत चालल्याचे चित्र आहे.