मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट
By Admin | Updated: July 14, 2016 01:01 IST2016-07-14T00:41:56+5:302016-07-14T01:01:21+5:30
अजीत चंदनशिवे , तुळजापूर तुळजापुरात दरवर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात सामाजिक संतुलनाला मोठा फटका बसू शकतो.

मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट
अजीत चंदनशिवे , तुळजापूर
तुळजापुरात दरवर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात सामाजिक संतुलनाला मोठा फटका बसू शकतो. नगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१५ साली शहरात मुलांची संख्या १ हजार ३९ तर मुलींची संख्या ८८९ एवढी असल्याचे पुढे आले आहे.
जानेवारी ते जून २०१६ ते या कालावधीत जानेवारी- पुरुष ८०, महिला ७५, फेब्रुवारी- पुरुष ८१, महिला ५८, मार्च- पुरुष ७७, महिला ७८, एप्रिल- पुरुष ७२, महिला- ८२, मे- पुरुष ८६, महिला ६७, जून- पुरुष ७१, महिला ५९ असे पुरुष एकूण ४६८ तर महिला ४१९ अशी जन्मसंख्या आहे. बेटी बचाव, देश बचाव, मुलींच्या जन्माचे स्वागत करा, अशी जनजागृती होत असली तरी तुळजापुरात स्त्री-पुरुष जन्मदराची ही परिस्थिती पाहता भविष्यात ही बाब चिंताजनक असल्याचे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले. मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे. महिलांसाठी विविध योजना शासनाने निर्माण केल्या आहेत. मुलांबरोबरच मुलींकडे लक्ष दिल्यास सामाजिक संतुलन कायम राखण्यास मदत होईल असे मतही डॉ. चाकुरकर यांनी व्यक्त केले.
लोकांनी मुलींच्या जन्माविषयी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तसेच सोनोग्राफी केंद्रात जर गर्भलिंग निदान होत असल्याची शंका अथवा माहिती असेल तर ‘आमची मुलगी डॉट कॉम’ या वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकता. मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. परंतु मुलींच्या जन्माचे स्वागत अत्यल्प प्रमाणात केले जात आहे.
हुंडा पध्दत मोडीत काढा
४आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले कुटुंबही आपल्या मुलीला नोकरदार चांगल्या कुटुुंबातील मुलगा मिळावा यासाठी लाखो रुपये हुंडा, सोने, चांदी देण्यासाठी तयार होतो. अशा प्रकारामुळेच मुली नकोत असा अनेकांना वाटते. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. यासाठी हुंडा पध्दत मोडीत काढायला पाहिजे. तुळजापूरकरांनी आता यासाठी पुढाकार घ्यायला हवा.