गौरी पुजनाऐेवजी सावित्रीचे पूजन
By Admin | Updated: September 5, 2014 00:13 IST2014-09-04T23:48:41+5:302014-09-05T00:13:51+5:30
शेख मोया, वस्सा वस्सा येथे गौरी पूजनाचा सण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.

गौरी पुजनाऐेवजी सावित्रीचे पूजन
शेख मोया, वस्सा
जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे गौरी पूजनाचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत होता. परंतु राऊत कुटुंबियाने पारंपरिक गौरी पूजनाऐवजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
गेल्या वीस वर्षापासून निर्विघ्नपणे हा अभिनव पुरोगामी सण रामभाऊ राऊत हे साजरा करीत आहेत. कधी सूतक, इरळी किंवा अन्य कारणामुळे सावित्री पूजनाचा सणात खंड पडला नाही हे विशेष. आकर्षक आरस व सजावटीसह भक्तीभावाने राऊत कुटुंबिय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची व महात्मा फुले संमग्र वाङमयाचे वाचन करून पूजा करतात.
रामभाऊ राऊत हे वस्सा परिसरात महात्मा फुले यांचे कट्टर अनुयायी म्हणून परिचित आहेत. पारंपरिक प्रथेला छेद देत त्यांनी आपल्या मुलाचा सत्यशोधक पद्धतीने विवाह केला. ते स्वखर्चाने महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रचार करतात. रामभाऊ राऊत, पत्नी काशिबाई यांच्यासह २० वर्षापासून गौरी पूजना ऐवजी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेची पूजा करतात. तसेच त्यांची मुले व सूनाही या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेत आहेत.
अल्पशिक्षित असलेल्या राऊत दांपत्याने आपल्या कृतीतून दाखविलेले पुरोगामी धाडस सुधारकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे, एवढे मात्र खरे.
फुले दांपत्याविषयी कृतज्ञता
बहुजन समाजाची अस्मिता जागृत करणाऱ्या फुले दांपत्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा पुरोगामी सण साजरा करतो, असे रामभाऊ राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
काशिबाई राऊत म्हणाल्या, महिलांना शिक्षण देऊन सामाजिक बंधनातून मुक्त करणाऱ्या व महिलांचा स्वाभिमान जागृत करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूूजन करताना आनंद होतो.