पॉकेट्समध्येच चिंता!
By Admin | Updated: February 5, 2017 00:04 IST2017-02-04T23:59:13+5:302017-02-05T00:04:30+5:30
जालना : प्रमुख पक्षांसह इतर छोट्या छोट्या पक्षांनी आघाडी करुन निवडणुकीत चुरस वाढवली आहे.

पॉकेट्समध्येच चिंता!
जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह इतर छोट्या छोट्या पक्षांनी आघाडी करुन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. असे असले तरी रिंगणात कोण राहतो याचे चित्र ७ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषदेत आपली सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. नाराजांनी बंडाचा झेंडा रोवल्याने अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत. यंदा प्रथमच शिवसेना आणि भाजप युती न झाल्याने दोन्ही पक्षांचे बळ या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली असली तरी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मानसिकता अद्याप आघाडीसाठी तयार झाली नसल्याचे दिसून येते. याचाही फटका आघाडीच्या उमेदवाराला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मंत्र दिला तरच काही चमत्कार घडू शकेल. अन्यथा गटागटात विभागून आघाडीचेच नुकसान होण्याचा अधिक धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणूक निकालानंतरचे चित्र काय असेल, याचा अंदाज बांधून राजकीय वैर विशिष्ट पातळीपर्यंत ठेवण्याचा नेत्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे दिसून येते. कारण कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. त्यामुळे युती किंवा आघाडी करुनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)